अकोला एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण आता राज्यभरात अनेक ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची केस लढण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याप्रकरणी या तक्रारी नोंदवल्या जात असल्याचं समोर आलं आहे. अकोल्यात सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्तेंविरोधात ही तक्रार केली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून 530 रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत संजय मुंडे या कर्मचाऱ्याने सांगितलं की, जे लोक निलंबीत नाहीत, त्यांच्याकडून ३०० रुपये घेतले. असे १ लाख दहा हजार रुपये स्वारगेट आगारातून त्यांना जमा करुन दिले होते. तर मी सस्पेंड असल्याने ५४० रुपये मी स्वत: त्यांना दिले होते असं संजय मुंडेंनी सांगितलं.