शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. आज पुण्यतिथी उत्सवाचा महत्त्वाचा दिवस असल्याने देश – विदेशातील लाखो भाविकांनी साईदर्शनासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या साईभक्तांना दर्शन सुकर व्हावे यासाठी आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेतला आहे.
लाखो भाविक शिर्डीत दाखल
दसरा सण आणि पुण्यतिथी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून साईनामाचा जयघोष करत भाविक प्रसन्न वातावरणात साईबाबांचे दर्शन घेत आहेत. भाविकांच्या गर्दीने शिर्डीनगरी फुलून गेली आहे. दोन वर्षानंतर कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात आज चार दिवसीय उत्सवाला सुरुवात झाली आहे. चार दिवस चालणाऱ्या पुण्यतिथी उत्सवाच्या अनुषंगाने साई चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांनी शिर्डीत गर्दी केली आहे. १०३ वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दिवशी द्वारकामाईत साईबाबांनी आपला देह ठेवला होता त्या द्वारकामाई परिसरातदेखील भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. या उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक सजावटदेखील करण्यात आली आहे.
सायंकाळी सिमोल्लंघनाचा कार्यक्रम
पुण्यतिथी उत्सवाला मोठी परंपरा असून आज भिक्षा झोळी, आराधना विधी यासह सायंकाळी पाच वाजता ज्या खंडोबा मंदिरात साईबाबा प्रथम नजरेस पडले तिथे सिमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिरासह परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर दर्शन रांगा भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
राज्यभरात उत्साह
हिंदू संस्कृतीत दसऱ्याला मोठे महत्त्व आहे. आश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. आज ५ ऑक्टोबर या दिवशी भारताच्या विविध प्रांतामध्ये विजयादशमी आणि दसर्याचा सण साजरा केला जात आहे. दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा म्हणत राज्यभरातही आनंद ओसंडून वाहत आहे.