अवकाळी पावसामुळं पिकांना फटका, आर्थिक मदतीची मागणी

शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (12:38 IST)
राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसाचा ग्रामीण महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. राज्यात मागील दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पावसाची शक्यता कायम आहे. याचा थेट परिणाम पिकांवर होताना दिसत आहे.
 
चाकण मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भिजलेल्या कांद्याला कुणीही खरेदी करीत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणी शेवटच्या टप्प्यात असताना अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडले आहेत. पावासामुळे भात पाण्यात गेल्याने भाताला कोंब आले असून गवत कुजून गेलं आहे. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहे कारण भात वाया जात असून गवत कुजल्याने जनावरांचे हाल होणार आहेत.
 
हिंगोलीत ढगाळ वातावरणाचा गहू, हरभरा तूर, कापूस, ज्वारी या सारख्या पिकावर परिणाम होणार असून शेतकरी संकटात आढळला आहे. इकडे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे 75 ते 80 हजार एकरावरील घडकुजीने नुकसान झाल्याचे कळून येत आहे. सदर नुकसान सुमारे साडे तीन हजार कोटींचे असल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना काही हातभार लावता येईल यासाठी विविध संघटनांकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती