पैशांसाठी मित्राचा खून करणार्‍यास न्यायालयाने ठोठावली जन्मठेप

शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (08:01 IST)
अहमदनगरमध्ये पैशांसाठी मित्राचा खून करणार्‍याला जिल्हा न्यायाधीश एम. आर. नातू यांनी जन्मठेप आणि 20 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अमित बाबूराव खामकर (वय 28 रा. क्रांती चौक, सुतार गल्ली, केडगाव, अहमदनगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने राहुल भागवत निमसे (रा. केडगाव) यांचा 28 जून 2018 रोजी खून केला होता.
 
केडगाव येथील राजू भागवत निमसे हे 28 जून 2018 रोजी त्यांचे अहमदनगर येथील काम संपल्यावर रात्री 11 वाजता घरी आले. त्यावेळी त्यांचा भाऊ राहुल हा घरात नव्हता. त्यांनी त्याबाबत त्यांच्या आईला विचारले असता आईने सांगितले की, रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास राहुल यास त्याच्या मित्रांचे फोन आले. त्यामुळे राहुल हा त्याचा मित्र अमित खामकर याच्याकडे जातो, असे सांगून सायकलवर गेला. राजू यांना रात्री 12 वाजता त्यांचे अरणगाव (ता. नगर) येथील मामा गोरख मारूती कल्हापुरे यांनी फोन करून अरणगाव शिवारात शरद मुथ्था यांच्या प्लॉटजवळ बोलविले. त्या ठिकाणी पोलिसांची वाहने व पोलीस आलेले होते. राजू निमसे यांनी जवळून पाहिले असता, मोकळ्या जागेत त्यांचा भाऊ राहुल हा मयत स्थितीत असल्याचे व त्याचे प्रेत हे पांढर्‍या रंगाच्या बेडशीटमध्ये गुंडाळलेले होते.
 
राजू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अमित खामकर विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपी अमित खामकर याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले.
 
जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी या खटल्यात 15 साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी, मयताचे शवविच्छेदन करणारे वैद्यकिय अधिकारी, घटनेच्या काही वेळ अगोदर आरोपी व मयत यांना एकत्र पाहणारा साक्षीदार, प्रेताची ओळख पटविणारा साक्षीदार, घटनास्थळ पंच साक्षीदार, आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबतचे पंच, सीसीटिव्ही एक्सपर्ट, मोबाईल शॉपचा मालक, फोटोग्राफर, जबाब नोंदविणारे व तपास करणारे पोलीस अधिकारी यांचा समावेश होता.
 
न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा, कागदोपत्री पुरावा, परिस्थितीजन्य पुरावा तसेच वकील सतिश पाटील यांचा युक्तिवाद ग्राहय धरून आरोपीस खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरण्यात आले. खुनाबद्दल जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड, पुरावे नष्ट पाच वर्ष सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास बांदल यांनी काम पाहिले.
 
दरम्यान अमित खामकर याने त्याचा मित्र राहुल निमसे यांचा खून केल्यानंतर त्याच्या खिशातील एटीएम कार्ड काढून घेतले. केडगाव येथील अहमदनगर शहर सहकारी बँकेतून 40 हजार रुपये रक्कम काढली होती. त्यानंतर आरोपीने किशोर वॉच अ‍ॅण्ड मोबाईल सेंटर, माणिक चौक, अहमदनगर येथून मोबाईल व एक सीमकार्ड विकत घेतले. त्याबाबतचा पुरावा हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला होता. हे पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती