मुंबईत साधारणत: ११ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी जी मंडळे रस्त्यावर मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात अशा मंडळांना पालिकेची परवानगी घ्यावी लागते. अशी साधारण तीन हजार मंडळे दरवर्षी पालिकेकडे परवानग्यांसाठी खेटे घालत असतात. दरवर्षी ही संख्या वाढत जाते. दरवर्षी पालिकेकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अडीच ते पावणे तीन हजार अर्ज येतात. यंदा मात्र परवानग्या सुरू केल्यापासून गेल्या पाऊण महिन्यात १९७ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
यंदाच्या गणेशोत्सवावरही करोनाचे सावट आहे. त्यातच गणेशमूर्तीच्या उंचीची मर्यादा, ऑनलाईन दर्शन, वर्गणी संकलनास मनाई, मोठय़ा जाहिरातींच्या प्रदर्शनावर बंदी अशा र्निबधांमुळे गणेशोत्सव साजरा करणे मंडळांना मुश्कील होऊ लागले आहे.