प्रकाश आंबेडकरांकडून अद्याप काँग्रेसला प्रस्तावच आला नाही. त्यांच्या प्रवक्त्याने पत्र लिहिले आहे. आघाडी करायची असल्यास पक्षाच्या अध्यक्षांनी स्वतः प्रस्ताव देणे अपेक्षित आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे किंवा सोनिया गांधी यांना प्रस्ताव द्यायला हवा. ॲड. आंबेडकरांना काँग्रेसचा विरोध असल्याचा प्रश्नच नाही. ते दोन वेळा काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत, असे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी आज येथे सांगितले.
अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. २०२४ मध्ये हाेऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळणार नाही. हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. कारण सध्याचे वातावरणच त्यांच्या विरोधात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामधूनही त्यांना विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या किमान ७० जागा कमी होतील, असा दावा केतकर यांनी केला.