मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे निधन

शनिवार, 3 एप्रिल 2021 (15:51 IST)
कामगार चळवळीतील सच्चा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड
नाशिक – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे (Shridhar Deshpande)यांचे आज शनिवार (दि.३) सकाळी कोरोनामुळे निधन झाले ते ८२ वर्षाचे होते. गेली ५ दशके त्यांनी कामगार चळवळी साठी महत्वाचे योगदान दिले होते.गेले आठवड्यापासून ते आजारी होते.सुरुवातीला किर्लोस्कर हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्यावर कराड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती सुधारत असतांनाच काल सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.आज सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
 
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्वदायी भूमिका बजावली शेतकरी कामगार चळवळी बरोबर श्रीधर देशपांडे (Shridhar Deshpande) यांनी जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका आणि पतसंस्थाच्या ठेवीदारांना न्याय मिळून देण्यासाठी मोठी चळवळ उभीकरून ठेवीदारांना न्याय मिळवून दिला.वर्तमान पत्रांमधून  ते सातत्याने लिखाण करत होते. सर्व पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते.श्रीधर देशपांडे (Shridhar Deshpande) यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया डाव्या संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
 
त्यांच्या पश्चात पत्नी मनीषा मुलगा हेमंत सून अश्विनी आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.
 
श्रद्धांजली
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे दुःखद निधन झाले.‌ सातत्याने शेतकरी कामगार यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लढा देणारे कॉम्रेड श्रीधर देशपांडे डाव्या पुरोगामी चळवळीतील एक महत्वाचे नेते होते. विमा कर्मचाऱ्यांचे नेते म्हणून सुमारे पाच दशके भरीव कार्य केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व सिटू संघटनेमध्ये त्यांनी नेतृत्वदायी भूमिका बजावली. जिल्ह्यातील बंद पडलेल्या बँका व पतसंस्थांच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांच्या निधनाने डाव्या पुरोगामी चळवळीची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. मी व माझे कुटुंबीय देशपांडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृत आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ,
मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य. तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती