हे शासन संत गाडगेबाबांच्या दशसूत्रीत दिलेल्या शिकवणुकीनुसार काम करत आहे. या दशसूत्रीत भुकेलेल्यांना अन्न हे एक सूत्र आहे ते डोळ्यासमोर ठेऊन शिवभोजन योजनेची आखणी करण्यात आली असून शिवभोजन थाळीने लाखोंची नाही तर कोट्यवधी लोकांची भूक भागविण्याचे काम केले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने व योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे सचिव, अधिकारी- कर्मचारी, शिवभोजन योजनेचे केंद्रचालक यांचे अभिनंदन केले आहे, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुरुवातीला लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत १० रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जात होते. परंतु कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २९ मार्च २०२० पासून ही थाळी फक्त ५ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येक थाळीमागे शहरी भागात ४५ तर ग्रामीण भागात ३० रुपयांचे अनुदान शासनामार्फत केंद्रांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेसाठी शिवभोजन ॲप तयार करण्यात आले असून त्याचा वापर करूनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेचा तालुकास्तरापर्यंत विस्तार झाला आहे.
टाळेबंदीच्या काळात मजूर, स्थलांतरीत लोक, राज्यातच पण बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना या थाळीने फक्त ५ रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून देऊन त्यांची भूक भागवण्याचे काम केले. चपाती, भाजी, वरण भाताचं जेवण असणारी ही थाळी आज अनेक गरजू लोकांसाठी वरदान ठरत आहे.