महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.आज संध्याकाळी ते नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे पोहोचणार आहेत. उद्या मालेगाव आणि नाशिक येथील कार्यक्रम आटोपून संध्याकाळी ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे येणार आहेत. 31 जुलै रोजी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याशिवाय ते मराठवाड्यात पावसामुळे जे नुकसान झालं, त्याचीही विभागीय आढावा बैठक घेणार आहेत.यासोबत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे ते त्यांच्या गटातील आमदारांच्या संपर्क कार्यालयांना भेटी देणार आहेत.
या संपूर्ण दौऱ्यात दोन राजकीय सभा आणि एक पत्रकार परिषद होणार आहे. तर मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांना हजेरी सुद्धा लावणार आहे. शनिवार, 30 जुलै 2022 दुपारी 3 वाजता मालेगाव येथून वैजापूरकडे रवाना होतील. संध्याकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, वैजापूर येथे आगमन व राखीव वेळ असणार आहे. त्यानंतर 6.30 वाजता वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे मुख्यमंत्री यांची जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर रात्री 8 वाजता वैजापूर येथून औरंगाबादकडे रवाना होतील.
रविवार 31 जुलै, 2022 रोजी सकाळी 10 ते 11.30 या वेळेत मुख्यमंत्री हे विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील पाऊस, अतिवृष्टी, पिक-पाणी व विकास कामे यांचा आढावा घेतील. त्यानंतर सकाळी 11.30 ते 12 या वेळेत पत्रकार परिषद घेतील. मुख्यमंत्री हे 12.30 वाजता औरंगाबाद येथून सिल्लोडकडे रवाना होतील.