"मला गोळी मारली जाईल, हा पोलिसांचा रिपोर्ट आहे," असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.मराठा आरक्षणावर विधीमंडळात चर्चा सुरू आहे. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, ''24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फार्म हे ज्यांना कोणाला बघायचं आहे त्यांनी नावं कळवावी, असं व्हायरल होतंय. याचा अर्थ ते माझ्याकडे येणार आहे. म्हणजे प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर यांचं जे झालं तेच माझं होणार.
''मी दोन दिवस विचारतोय की पोलीस का वाढवताय? पोलीस सांगतायेत वरून की, तुमच्यावर हल्याचे इनपुट आहेत. हा पोलिसांचा रिपोर्ट आहे की, भुजबळांना गोळी मारली जाईल. मारा. त्याला कोणी बोलू नका.''
ते पुढे म्हणाले, “माझ्यासाठी मराठा, ओबीसी हा सगळा समाज सारखा आहे. माझी प्रतिमा अशी निर्माण केली गेली की, भुजबळ विरोधात आहेत. जेव्हा मराठा आरक्षणाचा कायदा केला तेव्हा मी समर्थन दिलं होतं."
“मी काय म्हटलं? ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहीजे. सगळे तेच म्हणतायेत. पवारसाहेब, मुख्यमंत्री, सगळ्या आमदारांची हीच भूमिका आहे. मग मलाच का टार्गेट केलं जात आहे? मी काय वेगळं बोलतोय?”
छगन भुजबळ यांनी मांडलेले मुद्दे -
सारथीच्या वसतीगृहासाठी पैसे मंजूर झाले. महाज्योतीसाठी तितक्या जागा नाही. त्यांना देता मग आम्हालाही द्या.
महाज्योतीसाठी 27 कोटींची मागणी, पण अजून जागाही मिळत नाही. सारथीच्या वसतीगृहांसाठी 9 ठिकाणी बांधकामं सुरू झाली. मग आम्हाला का देत नाही?
सरकारी नोकरीत ओबीसी आरक्षण 27% असलं पाहीजे,पण प्रत्यक्षात साडे नऊ टक्के आहे. जे सारथीला मिळतंय ते महाज्योतीलाही द्या. जातगणना करा. बिहारने केलं तर आपल्या करायला काय?
दोन महिने आधी तो म्हणतोय, भुजबळ आरक्षण घेऊनच दाखवेन. मला माहितीच नव्हतं जरांगे कोण? मला, बायकोला, घरच्यांना सगळ्यांना मेसेज मग मी बोलायला लागलो. मला इतक्या शिव्या दिल्या आहेत की तुम्हाला रेकॉर्ड दिले तर तुम्ही वाचू शकणार नाही.
बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंकींच्या घरावर जमाव गेला. मी पोलिसांशी बोलेपर्यंत घर जाळलं. संदीप क्षीरसागर यांचं हॉटेल जाळलं.
बीडमध्ये 79 पोलीस जखमी झाले. त्यांचा रेकॉर्ड घ्या. किती पोलीस जखमी झाले त्याची माहिती घ्या. माझा विरोध त्यांच्या आरक्षणाला नाही. माझा विरोध झुंडशाहीला आहे.
मोदीजींनी 10% EWS मध्ये आरक्षण दिलं. त्यात मिळालं ना मराठ्यांना आरक्षण.
शिंदे समिती जाहीर केली. ज्यांच्या निजाम नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ठरलं. ते ठीक आहे. पण नंतर या नोंदी वाढत गेल्या. महाराष्ट्रभर कुणबी प्रमाणपत्र देतायेत. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही घेणार का कुणबी प्रमाणपत्र?
आमदारांना गावबंद. मी म्हटलं अरे जाऊ द्या आमदारांना कामं आहेत. पण नाही. जाऊ देत नाहीत. अरे काय गावबंदी. यांच्या बैठका रात्री 12 नंतर. आमच्याकडे मुख्यमंत्री 10 नंतर स्विच ऑफ. मी म्हटलं गावबंदी चूक आहे.
जालन्याला जरांगेची सभा असल्यावर शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय काढला. नंतर प्रश्न उपस्थित केल्यावर तो मागे घेतला. त्यांच्याकडे काडतुसे आहेत, पिस्तुल आहेत. मग कारवाई का नाही करत?
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला. ते सांगतायेत दबाव आहे.
भुजबळांचं भाषण एकांगी - भास्कर जाधव
आमदार भास्कर जाधव मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, “आतापर्यंत ज्यांचं एकांगी भाषण झालं असेल तर ते छगन भुजबळांचं आहे. जर सगळ्यांची भूमिका सारखी आहे तर मग हा संघर्ष का होतोय? या लोकांना ते दिलं, त्या लोकांना ते दिलं. अरे तुम्ही मंत्रीमंडळात आहात. कोणी न्याय द्यायचा? आम्हाला का सांगताय? सरकारमध्ये तुम्ही आहात.”
'दररोज आग कशी लागेल यासाठी माणसं ठेवलीय'
विधानपरिषदेतील मराठा आरक्षणावरील चर्चेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब म्हणाले, “आज बाळासाहेब असते तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्या असं स्पष्ट म्हटलं असतं. त्यांची आठवण आज आली.
“दररोज आग कशी लागेल आणि वाद कसा पटेल यावर माणसं ठेवलीच आहेत. प्रसाद लाड यांनी त्यांना विचारलं की बोलविता धनी कोण आहे? आता त्यांनीही (जरांगे) सांगितलं आहे की 24 तारखे नंतर सांगतो. फक्त वातावरण खराब करण्याचं काम हे आहे. याच्या माध्यमातून कोण कोणाचं हिशोब चुकता करणार आहे, हे 24 तारखेला कळेल असं चाललाय सगळं.”
परब पुढे म्हणाले की, "चंद्रकांत पाटील यांना अध्यक्ष केलं आहे. पण त्यांना कोणी विचारत आहे की नाही कोणी? भूमिका कोण मांडत आहे? प्रसाद लाड आणि नितेश राणे? हे कोण आहेत दोघे? दादांना खड्यासारखं बाजूला काढून टाकलं आहे."