गेल्या अनेक दिवसांपासून शनी भाविकांची चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा ही मागणी होती यानुसार श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने विश्वस्तने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शनी चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी परवानगी दिली आहे. मधल्या काळात सुरक्षेच्या काणास्तवर चौथरा सर्वांसाठी बंद ठेवण्यात आला होता. काही वर्ष महिलांना शनी चौथऱ्यावर जाऊन तेलाभिषेक करण्यास बंदी घालण्यात आली होती. या वर 2015 मध्ये भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले होते.त्यानंतर महिलांना केवळ पादुकांपर्यंत जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आता सर्वांसाठी शनी चौथरा उघडण्यात आला असून आता महिलांना देखील तेलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ज्या भाविकांना शनी देवास तेल अभिषेक करावयाचा असेल अशा भाविकांना श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 500 रुपयांची देणगी पावती घ्यायची आहे. तेल अभिषेक पावतीसाठी भाविकांनी देवस्थानचे तेल विक्री काउंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी केले आहे.
राज्यासह, देशभरातील अनेक देवस्थानमध्ये भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन पेड पासेस दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच धर्तीवर शनी भक्तांच्या मागणीचा विचार करून शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.