अलिबागमध्ये धुमाकूळ घालणार्‍या चैन चोराला पोलीसांच्या बेड्या

शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (08:15 IST)
Chain thief in Alibaug chained by police अलिबाग तालुक्यात धुमाकूळ घालणार्‍या चोराला रायगड पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 6 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलीसांनी त्याला न्यायालयात हजर करण्यात केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
निखील पद्माकर म्हात्रे असे या चोरट्याचे नाव आहे. पनवेल तालुक्यातील करंजाडे येथील तो रहिवासी आहे. निखीलला ऑनलाईन ड्रीम इलेव्हन या खेळाचे व्यसन लागले होते. खेळाच्या आहारी जाऊन तो लाखो रुपये हरला आणि कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी त्याने चोर्‍या करण्यास सुरुवात केली.
 
पनवेल येथून तो अलिबागला यायचा. रस्त्यावरुन चालणार्‍या महीलांना एकटे गाठून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरायचा. अलिबाग तालुक्यात परहूरपाडा, पेढांबे, सहाण, येथे त्यांने याच पध्दीतीने चोर्‍या केल्या होत्या. त्यामुळे रायगड स्थानिक गुन्हे अन्वेशन पथक कामाला लागले होते.
 
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतूल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने या चोरट्याचा माग घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही कॅमेरे धुंडाळण्यास त्यांनी सुरुवात केली आणि निखिल पोलीसांच्या हाती लागला.
 
निखिलला करंजाडे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून पोलीसांनी 6 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व दुचाकी जप्त केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस हवालदार जितेंद्र चव्हाण, रुपेश निगडे, महिला पोलीस हवालदार अभियंती मोकल, पोलीस नाईक विशाल आवळे, पोलीस शिपाई अक्षय सावंत, स्वामी गावंड या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती