अलिबाग तालुक्यात एका महिलेने रस्त्यातच दिला बाळाला जन्म

बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (08:15 IST)
अलिबाग जिल्ह्याभरात ग्रामिण रस्त्यांची अवस्था काही वेगळी सांगायला नको. याच रस्त्यामुळे अलिबाग तालुक्यातील गारभाट खुटगाईन या अदिवासीवाडीतील एका गर्भवती महिलेची भर रस्त्यात प्रसूती करण्याची वेळ आली आहे. माता आणि बाळ सुखरुप आहेत. परंतू भयानक म्हणजे खराब रस्त्यांमुळे रुग्णवाहिका पोहचु शकली नाही हे वास्तव आहे.
 
दिनाकं 7 ऑगस्ट रोजी सकाळी साडे 8 वाजण्याच्या सुमारास गारभाट खुटगाईन या अदिवासीवाडीतील यशोदा गणपत केवारी या महिलेच्या पोटात दुखायला लागले.पक्का रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहीका जावून शकणार नव्हती. त्यामुळे या महिलेला घेऊन तीचे नातलग तीला एका छोट्या टेम्पोतुन हॉस्पिटलमध्ये जात होते.
 
कच्च्या, खराब रस्त्यामुळे तीच्या वेदना वाढू लागल्या. या वेदना असह्य झाल्याने गर्भवती महिला रस्त्यावरच आडवी झाली. त्यामुळे नातलग भांबावले. आजूबाजूच्या महिला धावून आल्या. रस्त्यातच महिलेची प्रसूती करावी लागली. यावेळी संतप्त महिलेच्या कुटुंबीयांनी पंचायत व आरोग्य विभागाला याबाबत जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
 
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीषा विखे यांनी, सदर महिलेला सातव्या महिन्यापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात आसल्याची माहिती दिली. तिची प्रसुतीची वेळ नंतर होती. मात्र त्या वेळे आधीच तिची प्रसूती झाली. सदर वाडीवर रुग्णवाहिका जाण्यास रस्ता नसल्याने तिला छोट्या टेंपोतून आणले जात होते. तिची प्रसूती झाल्यानंतर तिला दाखल करून घेत योग्य ते उपचार केले जात असल्याचेही डॉ मनीषा विखे यांनी सांगितले.
 
दरम्यान, देश स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष उलटली तरी, शासन मूलभूत सुविधा देखील पुरवू शकत नाही का? महिलेला अथवा तिच्या नवजात बाळाला काही कमी जास्त झालं असतं तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती