साध्या पद्धतीने घरीच छठपूजा साजरी करा, राज्याच्या मार्गदर्शक सूचना जारी

मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (08:33 IST)
छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दि. 9 नोव्हेंबरच्या सूर्यास्तापासून ते दि. 10 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या सूर्योदयापर्यंत छठपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. छठपूजा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहणार असून, नदी, तलाव अथवा समुद्राच्या काठी एकत्र न येता घरीच थांबून साध्या पद्धतीने छठपूजा साजरी करावी, अशी सूचना सरकारने केली आहे.

राज्याकडून जारी करण्यात आलेल्या सूचना खालीलप्रमाणे :

संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही छठपूजा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.

नागरिकांनी नदी, तलाव अथवा समुद्राच्या काठी एकत्र न येता गर्दी टाळावी व घरीच थांबून साध्या पद्धतीने छठपूजा साजरी करावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे.
महानगरपालिका/स्थानिक प्राधिकरण, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी व त्या ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण इ. उपाययोजना कराव्यात तसेच सुरक्षा व स्वच्छतेच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करावी. छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.
छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत.
 
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत, केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती