जळगावच्या RL ज्वेलर्स समूहावर CBIचा छापा; तब्बल 60 जणांच्या पथकाकडून झाडाझडती

बुधवार, 14 डिसेंबर 2022 (08:01 IST)
खान्देशातील प्रसिद्ध राजकीय नेते तथा उद्योजक राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाचे संचालक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खा.ईश्वरलाल जैन यांच्या आरएल समूहावर दिल्ली सीबीआयच्या सुमारे 60 जणांच्या पथकाने जळगाव, नाशिक व ठाणे येथील अस्थापना व घरांवर छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे राज्यात एकच खळबळ उडाली असून याबाबत अधिकृत माहिती देण्यास कुणीही समोर आलेले नाहीय. त्यामुळे नेमकं काय खरं खोटं?, याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही.
 
कोण आहेत राजमल लखीचंद ज्वेलर्स?
राजमल लखीचंद ज्वेलर्स म्हणजेच आरएल ही जामनेरच्या ईश्वरलाल जैन यांची जळगावात मोठी पेढी आहे. त्यांच्या ठाणे, कोल्हापूर आणि पुण्यातही पेढया आहेत. सोनं खरेदीसाठी महाराष्ट्रातील असंख्य ग्राहक राजमल लखीचंद ज्वेलर्सलाच प्राधान्य देतात. आर एलग्रुपची पेढी महाराष्ट्राच्या सुवर्ण क्षेत्रात अतिशय नावाजलेली कंपनी आहे. राजमल लखीचंद या फर्मचे सर्वेसर्वा ईश्‍वरलाल जैन हे राष्ट्रवादीचे माजी खजिनदार, तसेच राज्यसभेचे खासदार ही होते. राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या एका नेत्याचं हे प्रकरण समोर आल्याने पुन्हा एक खळबळ उडाली आहे.
 
नेमकं काय आहे प्रकरण
राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर जैन यांच्या आर. एल. ग्रुप म्हणजेच राजमल लखीचंद या सोने क्षेत्रातील नामांकित कंपनीने स्टेट बँकेकडून घेतलेलं कर्ज मुदतीत न भरल्याने कर्जासाठी तारण ठेवलेल्या विविध मालमत्तांवर स्टेट बँकेने जून २०१७ मध्ये प्रतिकात्मक ताबा घेतला होता. त्यामुळे राजमल लखीचंद ग्रुपला या मालमत्ता आता परस्पर विकता येणार नव्हत्या. पण या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं जैन यांनी सांगितलं होते. जैन यांच्या आर.एल ग्रुपने स्टेट बँकेकडून तारण ठेव योजनेतून 500 कोटीचं कर्ज घेतलं होतं. पण कर्जाची परतफेड वेळेत न केल्याने स्टेट बँकेने कंपनीच्या विविध मालमाता प्रतिकात्मक ताब्यात घेतल्या होत्या. याबाबतची माहिती नोटिसीद्वारे दिल्यानंतर जळगावच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. पण बँकेची कारवाईनंतर जैन यांनी स्टेट बँकेची कारवाई नियमबाह्य असल्याचं म्हटले होते. कराच्या पैशांची नियमापेक्षा जास्त रक्कम स्टेट बँकेने वसुली केल्याने, बँकेकडून आपलेच घेणे लागते. त्यामुळे बँकेच्या कारवाईबाबत आपण हायकोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं होते. तर दुसरीकडे बँकेकडून प्रतिकात्मक ताबा असल्याने, त्या विषयी आपल्याला कोणतीही तक्रार नाही. याविषयी आपली बँकेशी बोलणी अंतिम टप्प्यात असून यावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली होती.
 
आज एकाचवेळी टाकला छापा!
मुंबई येथील असून स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणावरून ईश्वरलाल जैन यांच्याविरुद्ध तक्रारी होत्या. त्या प्रकरणातच हे पथक सकाळपासून ठाण मांडून होते. ईश्वरलाल जैन हे आपल्या कार्यालयातच बसून होते. तेथे या पथकाकडून जाबजबाब घेण्यात येत होते. आरएल समूहाच्या राज्यभरात शाखा असून चारचाकी वाहनांचे देखील शोरुम आहे. स्टेट बँकेतील ५२५ कोटींच्या थकीत कर्जापोटी दिल्लीतील एका यंत्रणेच्या पथकाने आरएल समूहाच्या जळगाव तीन, नाशिकमधील एक तर ठाणे व जळगावातील घरांवर मंगळवारी सकाळच्या सुमारास एकाचवेळी छापा टाकला. याठिकाणाहून त्यांना लागणारे कागदपत्रे घेवून पथक माघारी परतले असल्याचे कळते.
 
बँक व आरएल समुहामध्ये वाद
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खा.ईश्वरलाल जैन यांच्या आरएल समूह नावाने राज्यभरात अस्थापना आहेत. यासाठी त्यांनी स्टेट बँकेकडून सुमारे ५२५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु काही कारणास्तव हे कर्ज थकले असल्याने बँकेकडे गहाण असलेल्या मालमत्ता बँकेकडून विक्री करण्यात आल्या होत्या. तरी देखील बँकेकडून आरएल समुहाकडे १५०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा दावा करीत असल्याने बँक व आरएल समुहामध्ये वाद सुरु होते. दरम्यान, बँकेतील कर्जाची सेटलमेंट करण्यासाठी समूहाकडून प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु बँकेने कर्जदाराला साक्षीदारांच्या स्वाक्षरी लागणार असल्याची अट त्यांना घातली होती. परंतु माजी खा. जैन यांचा मुलगा अमरीष जैन हा विभक्त राहत असल्याने तो स्वाक्षरी देण्यास तयार नव्हता. त्यामुळे हे प्रकरण मार्गी न लागत असल्याने स्टेट बँकेने याबाबतची तक्रार दिल्ली सीबीआयकडे केली होती.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती