सावधान, पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

बुधवार, 27 एप्रिल 2022 (08:49 IST)
नाशिक: भारतीय हवामान खात्याने  आज मंगळवारपासून २९ एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाडा  पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , कोकणामध्ये  उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. काल राज्यातील सर्वाधिक ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वर्धा येथे करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये पारा ४२.२ तर नाशकात ३९.६ अंशांवर होता.
 
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला असून प्रचंड उकाडा वाढला आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठला असून नागरिकांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. (Heat Wave in Maharashtra) उष्णतेचा हा वाढता पारा अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे. याचदरम्यान आता हवामान खात्याने आणखी एक इशारा दिला आहे.
 
भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील काही दिवसांत भारताच्या अनेक भागांमध्ये- महाराष्ट्रापासून ओडिशा (Odisha) आणि बंगालपर्यंत उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज वर्तवला आहे. उष्णतेची लाट म्हणजे जेव्हा कोणत्याही ठिकाणचे तापमान मैदानी भागात ४० अंश सेल्सिअस, किनारपट्टीच्या भागात ३७ अंश आणि टेकड्यांमध्ये ३० अंशांच्या पुढे जाते, अशी व्याख्या भारतीय हवामान खात्याने केली आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी कमाल तापमान ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअस असते जे त्या दिवसाच्या सामान्य तापमानापेक्षा जास्त असते तेव्हा उष्णतची लाट घोषित केली जाते.
 
प्रमुख शहरांतील तापमान
वर्धा ४५.०, ब्रह्मपुरी ४४.९, चंद्रपूर ४४.६, अकोला ४४.०, नागपूर ४३.६, गोंदिया ४३.४, वाशिम ४२.५, अमरावती ४२.६, मालेगाव ४२.२, परभणी ४१.९, नांदेड ४१.८, बुलढाणा ४१.०, औरंगाबाद ४०.४, सोलापूर ४०.४, उस्मानाबाद ४१.३, नाशिक ३९.६, पुणे ३९.१, कोल्हापूर ३८.६.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती