नागपुरात हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत लाडीकर ले आउट परिसरात एका महिला डॉक्टरची तिच्यात राहत्या घरी निर्घृण हत्या करण्याची घटना घडली आहे. मयत महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. डॉ.अर्चना अनिल राहुले असे या मयत महिलेचे नाव आहे. त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या.
त्यांचे पती अनिल राहुले हे देखील व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि रायपूरमधील एका रुग्णालयात काम करतात. त्यांचा मुलगा पुणे मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. डॉ. अर्चना तिच्या घरात एकट्या राहत होत्या. पती डॉ. अनिल जेव्हा जेव्हा सुट्टी मिळायची तेव्हा नागपूरला यायचे. शनिवारी रात्री 9.30 वाजता डॉक्टर अनिल बऱ्याच दिवसांनी घरी आले. दार उघडे होते आणि आतून भयानक वास येत होता.
आत गेल्यावर अर्चना बेडरूममध्ये जमिनीवर रक्ताने माखलेल्या पडल्या होत्या.पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेच्या वेळी त्या घरात एकट्याच होत्या. या काळात घरात कोण आले हे कळू शकले नाही. डॉ.अर्चना यांच्या डोक्यावर गंभीर जखमांच्या खुणा आहे. मृतदेह कुजलेले होते. डोक्यावर जड वस्तूने प्रहार करण्यात आला होता.