मजुरी मागणाऱ्या दलित मजुराचा तोडला हात

बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (15:03 IST)
- शुरैह नियाज़ी
मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात आपल्या केलेल्या कामाची मजुरी मागणाऱ्या दलित मेस्त्रीचा हात तोडण्यात आला होता.
 
त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी हात पुन्हा जोडला आहे. आता या मजुराच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.
 
रेवा जिल्ह्यातील सिरमौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोलगाव इथल्या अशोक साकेत यांचा हात तोडण्याची ही घटना आहे. 20 नोव्हेंबर रोजी 5000 रुपयांची मजुरी मागण्यातून झालेल्या वादात अशोक यांचा हात तोडला होता.
 
अशोक साकेत यांच्यावर रेवाच्या संजय गांधी रुग्णालयात 5 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. 8 डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर उपचार केले,
 
संजय गांधी मेडिकल कॉलेजचे प्रवक्ता डॉ. यत्नेश त्रिपाठी म्हणाले, ज्यावेळेस या व्यक्तीला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याचा हात तुटलेला होता. त्याच्यावर उपचार करणं अत्यंत आव्हानात्मक होतं.
 
ते म्हणाले, "अशा घटनेत शस्त्रक्रिया 6 तासांच्या आत झाली तर चांगलं असतं. मात्र इथं फार उशीर झाला होता. फार रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णाला धक्का बसला होता."
 
डॉक्टर म्हणाले, त्यांचं पहिलं लक्ष्य रुग्णाचा जीव वाचवणं हे होतं. त्यानंतर त्याची शस्त्रक्रिया करण्याचा कठीण निर्णय डॉक्टरांनी घेतला.
 
डॉ. त्रिपाठी पुढे म्हणाले, येत्या सात दिवसात तो हात पूर्णपणे काम करण्यास सिद्ध होईल अशी आम्हाला आशा आहे.
 
काय आहे घटना?
डोलगाव इथं गणेश मिश्रा यांच्या घर बांधकामाचा हिशेब करण्यासाठी पडरी इथं राहाणारे अशोक साकेत व सतेंद्र साकेत गेले होते. या हिशेबाच्या चर्चेत अशोक आणि गणेश यांच्यात पाच हजारांवरुन भांडण झाले. हे भांडण इतकं विकोपास गेलं की गणेश यांनी अशोक यांच्यावर स्वतःच्या तलवारीने हल्ला केला त्यामुळे अशोक यांचा हातच तुटला.
 
या घटनेनंतर सतेंद्र साकेत अशोक यांना घेन पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी संजय गांधी रुग्णालयात घेऊन गेले. पोलिसांच्या एका चमूने तुटलेल्या हाताचा शोध घेतला आणि तो जोडता यावा यासाठी रुग्णालयात नेला.
 
ही तलवार गणेश मिश्राच्या घरी खाटेखाली ठेवण्यात आली होती असं पोलिसांचं म्हणणं आहे. वाद झाल्यावर गणेश मिश्राने तलवारीचा वार केला मात्र अशोक यांनी हाताने तो वार रोखण्याचा प्रयत्न केला, त्यातच ही घटना घडली. यात गणेश यांचे कानही तुटले तसेच खांद्याला गंभीर जखम झाली.
 
पोलिसांच्या माहितीनुसार घटनेनंतर गणेश मिश्राने आपल्या मदतीसाठी स्वतःचा नातलग कृष्णकुमार मिश्राला बोलावले. पळून जाण्यासाठी त्याची मदत घेतली. तसेच एका भावाला पुरावे नष्ट करण्यास सांगितले.
 
मात्र याच दरम्यान पोलीस सक्रीय झाले आणि त्यांनी आरोपी व त्याच्या साथीदारांना पकडले.
 
रेवाचे पोलीस अधीक्षक नवनीत भसीन म्हणाले, "माहिती मिळताच सर्व आरोपींना पकडण्यात आले."
 
हात तोडल्यावर आरोपीने तो हात शेतामध्ये लपवला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
रेवामधली पहिली घटना
रेवामधील सामाजिक कार्यकर्त्या शिवानंद द्विवेदी यांच्यामते मजुरी न देण्याच्या घटनेवरुन हात कापण्यासारखी ही रेवामधली पहिलीच घटना आहे.
 
अर्थात मध्यप्रदेशात अशाप्रकारच्या घटना सापूर्वी घडलेल्या आहेत. गेल्यावर्षी गुणा जिल्ह्यात पाच हजार रुपये फेडू न शकणाऱ्या मजुराला कथितरित्या जाळले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती