मोबाईलसाठी आतेभावाला विहिरीत ढकललं

गुरूवार, 9 डिसेंबर 2021 (15:29 IST)
काही दिवसांपूर्वी पैठण परिसरात एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. या हत्येत धक्कादायक वास्तव आता समोर आले. अंकुश म्हैसमाळे (वय 16 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. आणि हत्येचं कारण म्हणजे मोबाईल न दिल्याच्या रागातून भावानेच हत्या केल्याचे उघडकीस झाले आहे. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नेमकं काय घडलं? 
आजोबांनी आपल्या आत्या भावाला दिलेला मोबाईल स्वत:ला मिळावा म्हणून एकाने आपल्या आतेभावाला विहिरीत ढकळून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतक आणि आरोपी हे दोघेही अल्पवयीन आहे. 
 
मयत अल्पवयीन मुलाला त्याच्या आजोबांनी मोबाईल घेऊन दिला होता आणि हाच मोबाईल आरोपी अल्पवयीन मुलाला हवा होता. मोबाईल मिळवण्यासाठी त्याने कट रचला. तो आतेभावाला बिर्याणी खायला आणि दारू पाजण्याची घेऊन गेला. पैठण तालुक्यात बिडकीन मधील एका बिर्याणी सेंटरवर दोघांनी बिर्याणी खाल्ली आणि बाजूच्या दारूच्या दुकानातून एक दारूची बॉटल घेतली. 
 
नंतर आरोपीने तुझ्या नव्या मोबाईलने माझा फोटो काढ म्हणून तो स्वतः विहिरीच्या काठावर उभा राहिला. नंतर तुझा फोटो काढतो म्हणून त्याला विहिरीच्या काठावर उभं केलं आणि विहिरीत ढकलून दिलं. त्याला थोडं पोहता येत होतं म्हणून त्याने मोटारला लावलेला दोर पकडला. जीव वाचवण्याची त्याची धडपड सुरु असताना आरोपीने विहिरीच्या बाजूवरचा दगड त्याच्या डोक्यात घातला आणि मोबाईल घेऊन पळ काढला. 
 
पैठण येथे 3 डिसेंबर रोजी ढोरकिन-बालनागर रोडवरील एका विहिरीत अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला होता. पैठण पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती आणि तपास सुरू असताना धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 
 
तपस करताना त्याच वयाचा एक मुलगा हरवल्याची तक्रार औरंगाबाद शहरातील वाळूज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यामुळे पैठण पोलिसांनी वाळूज पोलिसांशी संपर्क साधला तेव्हा सापडलेला मृतदेह हा त्या हरवलेल्या मुलाचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना सापडलेला मृतदेह हा वाळूज जवळील शेंदूरवादा गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा असल्याचे समोर आले. 
 
अधिक तपासात या अल्पवयीन मुलाची हत्या त्याच्या मामेभावाने केली असल्याचे समोर आले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती