अमृता फडणवीसांनी आरोप केलेल्या बुकीला गुजरातमधून अटक, पोलिसांची माहिती

सोमवार, 20 मार्च 2023 (15:36 IST)
16 मार्च 2023 रोजी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने एक बातमी छापली. धमक्या, षडयंत्र रचणे आणि एक कोटी रुपयांची लाच दिल्याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी अनिक्षा नावाच्या डिझायनर विरोधात पोलिसांत एफआयआर दिल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं.
 
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी हा एफआयआर मुंबईतल्या मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला.
 
एफआयआरमध्ये म्हटल्याप्रमाणे, 'अनिक्षाने अमृता फडणवीस यांना काही बुकींची माहिती देण्याची ऑफर दिली, ज्यामधून पैसे कमावता आले असते. तिच्या वडिलांना पोलीस केसमधून सोडवण्यासाठी एक कोटी रुपयांचीही ऑफर दिली.'
 
आता पोलिसांनी अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघानी यांना अटक केली आहे. यासंबंधी मुंबई पोलीस आज (20 मार्च) अधिक माहिती दिली.
 
मुंबई पोलिसांची पाच पथकं निर्माण केली होती. वेगवेगळ्या राज्यात हे अभियान राबवलं जात होते. सदर आरोपी शिर्डीवाटे बारडोलीला पळून गेला होता. तीन पथकं गुजरात मध्ये पाठवण्यात आलें.. गुजरात पोलिसांशी समन्वय करून ऑपरेशन राबवलं. आरोपींनी 72 तास गुंगारा दिला. रात्री पावणेबाराला नाकाबंदी करून कलोल येथे गुजरात पोलिसांच्या मदतीने पकडलं. मोबाईल, इंटरनेट संसाधने कार जप्त केली. त्याच्याबरोबर इतर आरोपीना अटक केली आहे. बरीच आव्हानं आली. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांचं कौशल्य वापरण्यात आलं.
 
आरोपीला मलबार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं. अशी माहिती उपयुक्त बालसिंग राजपूत यांनी दिली.
 
अमृता यांनी दाखल केलेल्या एफआयरमधल्या माहितीनुसार, 'अनिक्षा आणि अमृता फडणवीस जवळपास सोळा महिन्यांपासून संपर्कात होत्या आणि अनिक्षा फडणवीसांच्या घरीसुद्धा येऊन गेली होती.'
 
एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी असं म्हटलं आहे की, '18 आणि 19 फेब्रुवारी रोजी अनिक्षाने त्यांना अनोळखी नंबरवरुन व्हीडीओ क्लिप्स, व्हाईस नोट्स आणि मेसेजेस पाठवले. '
 
अनिक्षा तिच्या वडिलांसोबत अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे धमकावत होती आणि त्यांच्या विरोधात षडयंत्र रचत होती, असा दावा फडणवीस यांन एफआयआरमध्ये केला आहे.
 
एफआयआरमध्ये अनिक्षा आणि तिच्या वडिलांचा उल्लेख आरोपी म्हणून आहे, असंही इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये म्हटलं आहे. त्या दोघांविरोधत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं नमूद केलेलं आहे.
 
अमृता फडणवीस यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, अनिक्षाने ती कपडे, ज्वेलरी आणि पादत्राणांची डिझायनर असल्याचा दावा केला.
 
तिने अमृता फडणवीस यांना तिने डिझाइन केलेल्या वस्तू सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये घालण्याची विनंती केली. तिची विनंती अमृता फडणवीस यांनी मान्य केली. त्यांची पहिली भेट 2021 मध्ये झाल्याचंही अमृता फडणवीस यांनी जबाबात म्हटलं आहे.
 
अनिक्षाने दिलेले डिझायनर कपडे तिला परत केल्याचंही अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेत निवेदन
'इंडियन एक्सप्रेस'ची बातमी समोर येताच त्याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले.
 
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन केलं. घटनाक्रम काय होता आणि नेमकं काय झालं याची माहिती त्यांनी दिली.
 
“माझ्या पत्नीने अशा प्रकारचा एक एफआयआर फाईल केला आहे की, तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करुन घेण्याकरता प्रयत्न झाला. पहिले पैसे ऑफर करण्यात आले. मग ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले की, “याची वस्तुस्थिती अशी आहे की, अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती आहे, जो गेले सात-आठ वर्ष फरार आहे. या व्यक्तीवर 14-15 गुन्हे आहेत. याची एक मुलगी आहे. ती हुशार असून शिकली सवरलेली आहे. ही मुलगी सुमारे 15-16 दरम्यान कधीतरी अमृताला भेटत होती. नंतर तिचं येणं बंद झालं.
 
“अचानक 2021 साली या मुलीने पुन्हा माझ्या पत्नीला भेटणं सुरु केलं. यावेळेस तिने सांगणं सुरु केलं की, मी डिझायनर आहे. मी डिझायनर कपडे दागिने तयार करते. तिने तिच्या आईवरच्या पुस्तकाचं घरच्या घरी प्रकाशनही करवून घेतलं. विश्वास संपादित केला.”
 
विश्वास संपादित केल्यावर काही दिवसांनी घरी येणं जाणंही सुरु केलं असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्यानंतर तिने तिच्या वडिलांना केसेसमधून सोडवण्याविषयी अमृता फडणवीसांना सांगितलं.
 
“ती म्हणायला लागली की माझे डिझायनर कपडे तुम्ही वापरा. मुंबईत अशी पद्धत आहे. ते वापरुन परत करायचे असतात, अशी पद्धत आहे. सरकार बदलल्यानंतर तिने सांगितलं की माझ्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये फसवले आहे. तुम्ही त्यात मदत करा. माझ्या पत्नीने सांगितलं की, तुझं काही निवेदन असेल तर उपमुख्यमंत्री साहेब त्यात काय करायचं ते बघतील. काही दिवसांनी तिने बोलणं सुरु केलं की माझे वडील सगळ्या बुकीजला ओळखतात.
 
“मागच्या काळामध्ये आम्ही बुकीजची माहिती द्यायची. ती माहिती घेऊन तिथे रेड व्हायच्या आणि त्या रेडमधून दोन्हीकडून आम्हाला पैसै मिळायचे. तुम्ही जर थोडी मदत केली तर आपणही अशा रेड करु. त्यावेळी माझ्या पत्नीने सांगितलं की हे आमचं काम नाही आणि अशा फालतू गोष्टी माझ्याशी करायच्या नाहीत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.
 
वडिलांना सोडवण्यासाठी तिने एक कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
“वारंवार बुकीजच्या विषय आला तेव्हा माझ्या पत्नीने तिला ब्लॉक केलं. दोन दिवसाने एका अनोळख नंबरवरुन व्हिडीओ, क्लिप आल्या. यात एक गंभीर व्हीडिओ दिसला. ही मुलगी एक बॅग भरतेय, त्यात पैसै भरतेय आणि दुसऱ्या व्हिडीओत ती बॅग आमच्या घरी काम करणाऱ्या एका बाईला देते आहे. त्या व्यक्तीने धमक्या पाठवल्या की हे व्हीडीओ आहेत.
 
हे व्हीडिओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल. माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत. तुम्ही आम्हाला मदत करा आणि केसेस मागे घेण्याची कारवाई सुरु करा. हे माझ्या पत्निने मला सांगितल्यावर मी लागलीच पोलिसांना बोलावलं. तात्काळ एफआयआर दाखल केला. पण तो पब्लिक नाही केला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
या निवेदनामध्ये फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा केला.
 
"मी वारंवार हे सांगत होतो यापूर्वी की, मला अडचणीत आणायचा प्रयत्न केला. पण काहीच सापडलं नाही. मला ही हिंट होती की माझ्या कुटुंबावर काहीतरी चाललेलं आहे. कारण काही लोक मला सांगायचे की, तुमच्या कुटूंबाला ट्रॅप करायचे प्रयत्न सुरु आहेत. पण ईश्वराच्या कृपेने सगळे पुरावे हातामध्ये आले. ती व्यक्ती जर हातामध्ये आला असता तर यामागे कोण आहे, हे कळले असते.
 
"आश्चर्याची गोष्ट अशी आहे की अनेक मोठ्या नेत्यांसोबत त्याचं संभाषण आहे. यासंदर्भातले नाहीयेत. जुने आहेत. अनेक मोठे नेते आहेत. पोलीस त्यांचं काम करत आहेत. पण या निमित्ताने हा विचार करावा लागेल की राजकारणात आपण कोणत्या पातळीवर जात आहोत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
ट्विटरवर शाब्दिक युद्ध
ही बातमी समोर आल्यानंतर शिवसेने (ठाकरे गट) च्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी इंडियन एक्सप्रेसची बातमी ट्वीट करत म्हटलं की, “एका गुन्हेगाराची मुलगी पाच वर्षांपासून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी जाते, त्यांच्या पत्नीसोबत संपर्कात असते. त्यांच्या पत्नीला कपडे, दागिने देते. सोबत गाडीतून फिरते. यानंतर उपमुख्यमंत्री आरोप करतात की हे राजकीय षडयंत्र आहे. पोलिस गृहमंत्र्यांना रिपोर्ट करतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तक्रारदार अमृता फडणवीस आहेत. या प्रकरणात स्वतंत्र चौकशी व्हायला नको का?”
प्रियंका चतुर्वेदींनी पुढे हे ही म्हटलं की, "या ठिकाणी जर कुणी विरोधी पक्षाचा नेता असता, तर हेच उपमुख्यमंत्री भ्रष्टाचार म्हणून ओरडले असते. ईडी, सीबीआयने यात उड्या घेतल्या असत्या आणि एसआयटी केली असती."
प्रियंका चतुर्वेदी यांच्या या ट्वीीवर अमृता फडणवीस यांनी तिखट शब्दांत टीका केली.
 
अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
प्रियंका चतुर्वेदींच्या ट्वीटला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “मॅडम चतुर, आधी तुम्ही चुकीचा आरोप केला होता की, मी अॅक्सिस बॅंकेला नफा करुन दिला. आता तुम्ही माझ्या प्रामाणिकपणाला आव्हान देताय? तुमच्या विश्वास संपादित केल्यावर, पैशाच्या बदल्यात केस बंद करण्यासाठी जर कुणी तुम्हाला ऑफर दिली असती तर तुमच्या मालकाकडून तुम्ही ते केलंही असतं. ही तुमची औकात आहे.”
यावर प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, “मिस फॅड-नाॅईज, सुदैवाने प्रोमोशनसाठी डिझायनर कपडे घेणे , जे नंतर अडचणीचं ठरू शकतं ही माझी औकात नाही. स्वतंत्र चौकशीच्या मागणीने तुम्हाला राग का आला?”
अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या ट्विटर-युद्धात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही टिप्पणी केली.
 
महुआ मोईत्रा यांनी म्हटलं की, “ मी सहमत आहे प्रियंका. लो बजेट हिंदी मुव्ही डायलॅग औकात या पातळीपर्यंत काही महिला खाली घसरतात. अशा प्रकारचे शब्द खऱ्या आयुष्यात कोण वापरतं?”
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती