'भाजपनं शिवसेनेच्या डोक्यावर पाय ठेवायचा प्रयत्न केला, काँग्रेस एवढी वाईट वागली नाही'

मंगळवार, 22 मार्च 2022 (10:43 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया 
भाजपने शिवसेनेच्या कुठल्याही आमदाराचं काम केलं नाही. शिवसेनेच्या डोक्यावर पाय ठेवण्याचाच प्रयत्न भाजपने त्यावेळी केला आहे. भाजप एवढी वाईट वागली. तर काँग्रेसने असं आमचं काय वाईट केलंय? असं म्हणत शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेससोबत सामोपचाराची भूमिका घेतल्याचं चित्र आहे.
 
उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या आमदाराचं निधन झाल्यानंतर त्याठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. ती जागा शिवसेनेचा बालेकिल्ला होता त्यामुळे आम्हाला ती जागा मिळाली पाहिजे, असा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. ही जागा काँग्रेसला देण्यावरून शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर हेही नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.
 
आता या जागावाटपासंबंधी क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाविकास आघाडीची स्थापना झाली त्यावेळेला तीनही पक्षापैकी एखाद्या पक्षाचा आमदाराचं निधन झालं तर त्याच पक्षाचा उमेदवार द्यायचा हा आघाडीचा करार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने कराराप्रमाणे ही जागा काँग्रेसला देण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

"हे सरकार पडत नाही म्हणून महाविकास आघाडीत काही आलबेल नाही असं पसरवलं जातंय. यात भाजप माहिर आहे. भाजपने आमची काळजी करु नये. ही पाच वर्षं नव्हे तर पुढची पाच वर्षं देखील महाविकास आघाडी पूर्ण करेल," असंही क्षीरसागर यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती