भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे, त्यांचा हेतूच आहे : दिलीप वळसे-पाटील

शनिवार, 23 एप्रिल 2022 (15:09 IST)
राज्यात अराजक सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. असे  राज्यात कधीच झालं नव्हतं असा आरोप करत विरोधी पक्षांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं आहे. 
 
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. पण काही लोक यासंदर्भात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राज्यात राहिली नाही अशा प्रकारे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. एखाद्या ठिकाणी अशाप्रकारची घटना घडली की लगेच मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली अशा प्रकारच्या निष्कर्श लावणं उचीत नाही, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. 
 
भाजपकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे, त्यांचा हेतूच तो आहे,  काहीतरी वातावरण तयार करायचं, त्रिपूरात एखादी घटना घडली की इथे काही तरी घडवून आणायचं, दंगली घडवायच्या, भोंग्यावरुन दोन समाजात अस्वस्थता निर्माण करायची. कोणाला हनुमान चालिसा वाचायची असेल तर ज्याने त्याने आपल्या घरी वाचावी, अमरावतीच्या घरी वाचावी, मुंबईच्या घरी वाचावी किंवा दिल्लीच्या घरी वाचावी, याच ठिकाणी वाचवण्याचा हट्ट कशाला असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती