'भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेबाबत मोदींशी चर्चा झाली होती पण...'

गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (11:35 IST)
महाराष्ट्रात 2019 मधील विधानसभा निवडणुकांनंतर समोर आलेल्या सत्तेच्या गणितामुळं अनेकांना धक्का बसला. विशेषतः सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजपलाही सत्तेपासून दूर राहावं लागलं. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडी करत सत्ता स्थापन केली.
 
पण, त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासंदर्भात दिल्लीत चर्चा झाली होती, मात्र मी स्वतः त्यांना त्यासाठी नकार दिला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
 
आमची भूमिका वेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला अंधारात ठेवायचं नाही, असं मी स्वतः मोदींना त्यांच्या कार्यालयात भेटून सांगितलं होतं, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
 
तरीही नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा यावर विचार करावा असंही म्हटलं होतं. शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर भाजपला राष्ट्रवादीची गरज भासली असू शकते असंही पवारांनी म्हटलं आहे.
 
लोकसत्ता या वृत्तपत्राच्यावतीनं शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'अष्टावधानी' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी शरद पवार यांनी मुलाखती दरम्यान या घटनांचा उलगडा केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती