MPSC कडून महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षेची घोषणा, 666 पदांसाठी काढली जाहिरात
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (21:18 IST)
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून (Maharashtra Public Service Commission) गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सेवेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लागलीच आज (28 ऑक्टोबर 2021) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची 666 पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पोलिस उपनिरिक्षक 376, राज्य कर निरीक्षक 190 आणि सहायक कक्ष अधिकारी पदांचा समावेश आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 द्वारे भरावयाच्या एकूण 666 पदांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर परीक्षा (MPSC Exam) दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती आयोगानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सामान्य प्रशासन विभागाकडील सहायक कक्ष अधिकारी पदाच्या 100 जागांवर, तर वित्त विभागाच्या राज्य कर निरीक्षक पदाची 190 आणि गृह विभागाच्या 376 पदांसाठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यास 29 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपासून सुरूवात होईल. तर अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक 19 नोव्हेंबर आहे.