अंधेरी पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ची मोठी घोषणा
बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (15:21 IST)
मुंबई – अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोट निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिची समोर आली आहे. शिवसेनेचे रमेश लटके यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. आता त्या जागी पोटनिवडणूक होत आहे. सहाजिकच या जागेवर शिवसेना उमेदवार देणार आहे. मात्र, शिवसेनेतील फुटीमुळे आता शिंदे गटही उमेदवार देण्याची चिन्हे आहेत. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६ अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एक जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक १५ ऑक्टोबर (शनिवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – १५ ऑक्टोबर (शनिवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर (सोमवार), मतदान – ३ नोव्हेंबर (गुरुवार), मतमोजणी – ६ नोव्हेंबर 2022 (रविवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण – ८ नोव्हेंबर (मंगळवार) असा निवडणूक कार्यक्रम आहे.
गेल्या निवडणुकीत
मागच्या निवडणुकीत शिवसेनेचे रमेश लटके विजयी झाले होते. त्यांना ६२ हजार ७७३ मते मिळाली होती. तर, अपक्ष उमेदवार मुरजी पटेल यांना ४५ हजार ८०८ आणि काँग्रेसचे अमिन कुट्टी यांना २७ हजार ९५१ मते मिळाली होती.
यंदाची लढत अशी होणार
अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे उमेदवार देणार नाहीत. त्यामुळे त्यांचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच तसे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिंदे गट-भाजप विरुद्ध मविआ अशी लढत होणार आहे. पण, प्रमुख सामना हा उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातच असणार आहे.
मतदार यादी
या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत मतदानासाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदारांची ओळख पटावी यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मतदार कार्ड वापरता येईल. तथापि, ज्या मतदारांकडे मतदार कार्ड नसेल त्यास आयोगाने निश्चित केलेल्या ९ ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदानावेळी जवळ बाळगणे आवश्यक आहे.
उमेदवारांना हे बंधनकारक
या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यासंदर्भातील माहिती वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर देणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या पक्षाकडून प्राधिकृत आहे, त्या पक्षालाही संबंधित उमेदवाराची निवड का केली याबाबतची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी आणि पक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor