मोठी घोषणा, दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल

बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (09:03 IST)
राज्यात दहावी आणि बारावीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि आरोग्यासंदर्भातील नियम लक्षात घेता सालाबादप्रमाणे यंदा नियोजित महिन्यामध्ये परीक्षा न घेता सरकारच्या संमतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक बदललं आहे. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा यंदा एप्रिल-मेमध्ये होणार आहेत. बारावीची परीक्षा २३ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान होणार असल्याचं मंडळाने स्पष्ट केलं आहे. मुंबई, कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोल्हापूर या नऊ विभागांमध्ये या परीक्षा एकाचवेळी घेतल्या जाणार आहेत.
 
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही १६ फेब्रुवारी २०२१ पासून हे नवीन वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे, यासाठीही एप्रिल आणि मे महिन्यामधील लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकाही जाहीर करण्यात आले आहे. कोरोनासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाबरोबरच आरोग्य विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतच परीक्षा घेण्याची परवानगी देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती