भीमा कोरेगावचे सत्य अखेर बाहेर, पूर्वनियोजित होता कट, वाचा अहवाल

मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (17:16 IST)
दोन समाजात तेढ निर्माण करून, पूर्वनियोजित दंगल घडवून आणत महाराष्ट्रातील वातवरण खराब केलेल्या भीमा कोरेगावचे सत्य अखेर समोर आले असून, चौकशी समितीने आपला पूर्ण अहवाल सरकारकडे सोपवला आहे. पोलिसांच्या गाफिलपणामुळे हिंसाचार घडल्याचं समितीनं अहवालात नमूद केलं आहे. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या हिंदुत्ववादी नेत्यांनी हिंसाचार होईल, अशी परिस्थिती निर्माण केली, असं देखील समितीनं म्हटलं आहे. त्यामुळे आता प्रकरणाला वेगळे वळण लागले असून सरकारला कठोर कारवाई करावी लागणार आहे. 
 
कोरेगाव भीमामधील हिंसाचारानंतर सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीनं आपला अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांकडे सुपूर्द केला. पोलीस महानिरीक्षकांनीच या समितीची स्थापना करण्याच्या सूचना केल्या होत्या. पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे या समितीचे अध्यक्ष होते. या अहवालानुसार वढू बुद्रुक आणि गोविंद गायकवाड यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती, असं या समितीनं अहवालात म्हटलं आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनुसूचित जातीच्या  समाजाच्या गोविंद गायकवाड यांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. 
 
संभाजी महाराजांच्या समाधीजवळील फलक बदलण्यात आला होता असे समितीने स्पष्ट केले आहे. 'संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गोविंद गायकवाड यांनी केलेल्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख समाधीजवळील फलकावर होता. तो फलक हटवून तिथे नवा फलक लावण्यात आला. या नव्या फलकावर गोविंद गायकवाड यांच्याबद्दलची चुकीची माहिती होती.याशिवाय नव्या फलकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांचा फोटोदेखील होता. संभाजी महाराजांच्या समाधीजवळ हेडगेवार यांचा फोटो लावण्याची गरज नव्हती. दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण व्हावी, यासाठी जाणीवपूर्वक नवा फलक लावण्यात आला. पोलिसांनी योग्य वेळी पावले उचलली असती, तर हिंसाचार टळू शकला असता,' असं सत्यशोधन समितीनं अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे आता दोषी कोण हे उघड झाले आहे. 
 
मिलिंद एकबोटे यांनी पेराणे फाटा येथील 30 डिसेंबरला  सोनाई हॉटेलमध्ये एक बैठक घेतली होती. '1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमामध्ये काळा दिवस पाळण्याचं आवाहन या बैठकीत एकबोटे यांनी केलं. यानंतर तसं पत्र कोरेगाव भीमाच्या ग्रामस्थांनी पोलिसांना दिलं आहे. त्यामुळे सर्व पूर्व नियोजित होते असे उघड झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती