वाहनधारकांनो सावधान ! नियमांचे उल्लंघन पडेल महागात

शनिवार, 4 डिसेंबर 2021 (15:02 IST)
केंद्र सरकारने केंद्रीय मोटार कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना जास्त दंड भरावा लागणार आहे.
त्यासंबंधी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या नियमांची वाहतूक पोलीस कठोर अंमलबजावनीही करणार आहेत. ही अधिसूचना 1 डिसेंबरपासून लागू झाली आहे.
पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करणे, प्रदूषण नियंत्रणाखाली प्रमाणपत्र नसणे, कागदपत्रे सादर न करणे, काचेवर गडद फिल्म किंवा जाहिराती न लावणे, सिग्नल जंप करणे आणि सीट बेल्ट न लावणे यासाठी आता 500 रुपये दंड भरावा लागेल.
जाणून घ्या काय असणार आहे दंडाची रक्कम… सार्वजनिक ठिकाणी शर्यतीचा दंड पहिल्या गुन्ह्यासाठी 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये आणि प्रत्येक दुसऱ्या सलग गुन्ह्यासाठी 10,000 रुपये करण्यात आला आहे.
अनधिकृत व्यक्तीला वाहन चालविण्यास परवानगी दिल्यास मालकास 5,000 रुपये दंड आकारला जाईल. हे आधी 500 रुपये होते. विम्याशिवाय वाहन चालवल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी 300 रुपयांवरून 2,000 रुपये आणि दुसऱ्या आणि सलग गुन्ह्यासाठी 4,000 रुपये दंड करण्यात आला आहे.
तर लायसन्स होणार रद्द… दुचाकीस्वार दोघेही हेल्मेटशिवाय आणि आसन क्षमतेपेक्षा जास्त लोक पकडले गेल्यास दुचाकीस्वाराचा ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी अपात्र ठरवला जाईल.
रस्ता सुरक्षा, ध्वनी नियंत्रण आणि वायू प्रदूषण यांच्या संदर्भात विहित केलेल्या मानकांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्तीने वाहन चालविल्यास परवाना देखील अपात्र ठरविला जाईल. यासाठी दंडाची रक्कमही वाढली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती