बेस्ट कामगारांच्या वेतन कराराचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिष्टाई केली होती. मात्र ती अयशस्वी ठरल्याने बेस्ट कामगारांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. बेस्ट प्रशासनाने आमचा अंत पाहू नये नाहीतर कामगारांनी दिलेला संप पुकारण्याचा कौल वापरण्यात येईल असा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला आहे.
वेतन कराराच्या प्रश्नाबाबत १९ हजार कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. प्रलंबित वेतन करार, अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, दिवाळीचा बोनस आणि अन्य मागण्यांसाठी संप करण्याचा कौल बेस्टमधील १९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी मतदानाद्वारे दिला असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास बेस्टमध्ये संप होण्याची चिन्हे आहेत.
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा संप करावा का यासाठी कृती समितीने शुक्रवारी कर्मचाऱ्यांचे मतदान घेतले. कृती समितीने शनिवारी मतमोजणी केली. सुमारे १७ हजार ९२५ कर्मचाऱ्यांनी मतदान केले असून १७ हजार ४९७ म्हणजे ९८ टक्के कर्मचाऱ्यांनी संप करण्याच्या बाजूने कौल दिला, तर ३६८ कर्मचाऱ्यांनी संप करू नये असे मत दिले.