बेळगाव-नागपूर विमानफेरीला होणार प्रारंभ

सोमवार, 21 मार्च 2022 (08:28 IST)
उडान-3 अंतर्गत बेळगावसाठी मंजूर झालेल्या बेळगाव-नागपूर या मार्गावर दि. 16 एप्रिलपासून विमानफेरी सुरू केली जाणार आहे. स्टार एअरने यासाठी बुकिंग सुरू केले असून अवघ्या दीड तासामध्ये महाराष्ट्राच्या उपराजधानीला पोहोचता येणार आहे. या विमानफेरीमुळे बेळगावमधील कार्गोसेवेला बळ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
 
स्टार एअरने 2020 मध्ये बेळगाव-नागपूर विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे ही विमानफेरी पुढे ढकलण्यात आली होती. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे स्टार एअरने विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडय़ातून दोन दिवस ही विमानफेरी असणार आहे. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूर शहराची ओळख असून एक कार्गो हब्ब म्हणून उदयाला येत आहे. उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच नागपूर शहराला विमानफेरी सुरू होत असल्याने याचा उपयोग बेळगावच्या विकासाला होणार आहे.
 
16 एप्रिलपासून या विमानफेरीला प्रारंभ होणार आहे. स्टार एअरने विमानफेरीसाठी बुकिंग सुरू केले असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून ही विमानफेरी सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत होती. अवघ्या दीड तासात नागपूरला पोहोचता येणार असल्याने प्रवाशांनाही या फेरीची उत्सुकता लागली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती