अकरावी प्रवेशासाठी डेमो अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

सोमवार, 23 मे 2022 (14:47 IST)
अकरावी प्रवेश प्रक्रियेदरम्यान अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणीसारख्या अनेक समस्यांना दरवर्षी विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत असते. हा त्रास कमी करण्यासाठी शिक्षण संचालनालयाकडून अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून डेमो अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. डेमो अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 23 मेपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या अर्ज भरण्याचा सराव करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
 
दहावीचा निकाल जूनमध्ये लागण्याची शक्यता असल्याने शिक्षण संचालनालयाकडून अकरावी प्रवेश अर्जाच्या तयारीला सुरुवात केली आहे. अकरावीचे प्रवेश अर्ज 30 मेपासून भरण्यास सुरुवात होणार आहे, मात्र दरवर्षी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरताना अनेक चुका केल्या जातात. या चुका टाळून विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने अर्ज भरावा यासाठी शिक्षण संचालनालयाकडून त्यांना डेमो अर्ज ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी शक्यतो चुका टाळाव्यात, अर्जामध्ये कोणत्या बाबी विचारलेल्या आहेत, लॉगिन आयडी कशा पद्धतीने तयार केला जावा, अर्ज भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे याची माहिती या डेमो अर्जामध्ये दिली जाणार आहे.
 
त्यामुळे 23 ते 27 मेपर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग 1 भरता येणार आहे. हा डेमो अर्ज विद्यार्थ्यांनी स्वत: भरायचा आहे. विद्यार्थ्यांनी डेमो अर्जामध्ये भरलेली माहिती 28 मे रोजी नष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर 30 मेपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नव्याने ऑनलाईन नोंदणी व लॉगिन करून अर्ज भरायचा आहे, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.
 
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होतात. त्यामुळे या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सरावासाठी देण्यात येणार्‍या डेमो अर्जामध्ये फक्त पहिला भाग विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. अर्जाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा डेमो अर्ज देण्यात येत आहे. डेमो अर्जामध्ये भरलेली माहिती 28 मेनंतर नष्ट करण्यात येणार आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती