कोल्हापुरात ऊसतोडणी ठेकेदाराची हत्या

बुधवार, 16 मार्च 2022 (16:20 IST)
ऊस तोडणी मजूर  पुरवठा करणाऱ्या बीड जिल्ह्यातील ठेकेदाराचा कोल्हापुरात मृतदेह आढळून आला आहे. अतिशय निर्घृणपणे या ठेकेदाराची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं आहे. या ठेकेदाराचे शीर  धडावेगळे करण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह  हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता. सुधाकर उर्फ सुदाम हनुमंत चाळक असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तुकाराम मुंढे (रा. धारूर, जि.बीड), रमेश मुंढे (वडवणी, जि. बीड), दत्तात्रय देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची न्यायालयाने १७ मार्चअखेर पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
 
सुधाकर यांनी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या पुरवण्यासाठी दत्तात्रय देसाई यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. तथापि,चाळक यांनी देसाई यांना ऊसतोडणी मजुरांचा पुरवठा केला नाही. तसेच त्यांचे पैसे देखील परत दिले नाहीत. त्यामुळे देसाई यांनी तुकाराम व रमेश यांच्या मदतीने सुधाकर यांना कडगावला बोलवून घेतले. त्यानंतर त्यांना काही दिवस कडगाव पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील जंगलातील निर्जनस्थळी असणाऱ्या एका मंदिरात ठेवले होते. दरम्यान, सुधाकर यांना कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील खणदाळ याठिकाणी आणून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरून सुधाकरची मुले अक्षय आणि विशाल यांना फोन करून १२ लाख रुपये घेऊन संकेश्वर येथे येण्यास सांगितले. त्यासाठी सुधाकरला बेदम मारहाण करून त्यांच्या रडण्याच्या आणि विव्हळण्याचा आवाजही मुलांना ऐकवला आणि पैसे आणले नाहीत तर वडिलांना जीवे मारू अशी धमकीही दिली. दरम्यान, मंगळवारी रोजी रात्री सुधाकरला पुन्हा बेदम मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती