लवकरच मुंबईत परतणार, ठाकरेंनी त्यांच्या संपर्कातील आमदारांची नावं जाहीर करावी- शिंदे

मंगळवार, 28 जून 2022 (15:43 IST)
महाराष्ट्रात सुरू असलेल्या बंडाचा आज सात दिवस पूर्ण केले आहेत. गेला आठवडाभर महाराष्ट्रातल्या या राजकीय अस्थैर्यानं मुंबई-सुरत-गुवाहाटी-दिल्ली असा प्रवास केला आहे.
 
एकनाथ शिंदेंनी हॉटेल रॅडिसनबाहेर माध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, "की आम्ही लवकरच मुंबईला परतणार आहोत. आमच्या गटातील जे लोक उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात आहेत असा जो उल्लेख वारंवार केला जातो, त्या आमदारांची नावे जाहीर करावीत. लोकांची दिशाभूल करू नये."
 
एकनाथ शिंदे हे शिवसेना बंडखोर आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. आज ते हॉटेल रॅडिसनबाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले आमच्या गटाची जी भूमिका आहे ती वेळोवेळी दीपक केसरकर मांडत आहेत.
 
आपण शिवसेनेतच आहोत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ असल्याच्या भूमिका शिंदे यांनी पुन्हा अधोरेखित केली.
 
उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना आर्त हाक
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. ते म्हणतात, "आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो, कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे आपण या माझ्या समोर बसा."
 
शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा यातून निश्चित मार्ग निघेल आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती