पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हॉटेल चालकांचा पुढाकार

गुरूवार, 25 एप्रिल 2019 (09:54 IST)
बहुतेक हॉटेलमध्ये ग्राहकांनी मागण्याआधीच वेटर ग्लासभर पाणी ठेवतो. अधिक तहान नसल्याने बहुतेक ग्राहक त्यातील अर्धाच ग्लास पाणी पितात. परिणामी, उरलेले अर्धा ग्लास पाणी ओतून द्यावे लागते. अशाप्रकारे मुंबईतील हजारो हॉटेलमध्ये रोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होती. हीच नासाडी टाळण्याचे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने आहार संघटनेला केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आहार संघटनेने त्यांच्या 8 हजार सदस्यांना पाणी बचतीच्या उपक्रमात सामील होण्यास सांगितले आहे. त्यात आहारच्या सदस्य हॉटेलमध्ये पाणी वाचवण्याचे पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. तसेच ग्राहकांना सुरूवातीला अर्धा ग्लास पाणी देत अधिक पाणी हवे आहे का? याची विचारणा वेटर करणार आहेत.
 
पाणी बचतीसाठी आकर्षक स्लोगन तयार करून विविध चित्रांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोस्टर तयार करण्याचे काम जे जे कला महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी केले आहे. संबंधित पोस्टर्स हॉटेलच्या दर्शनीभागात लावण्यात येत आहेत. तूर्तास दादर, लोअर परळ, सायन, किंग्ज सर्कल येथील हॉटेलमध्ये हे पोस्टर्स दिसत आहेत. लवकरच मुंबईतील बहुतेक हॉटेलमध्ये हे पोस्टर्स लावणार असल्याचे आहारने स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती