अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार देणार : मेटे

शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (08:34 IST)
मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना विश्वासघातकी पुरस्कार देणार असल्याचा खोचक टोला शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी लगावला आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अशोक चव्हण यांच्यावर टीका केली आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्याव राज्यव्यापी बैठक घेण्यात आली.या बैठकीत अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाच्या विरोधात निर्णय घेतले असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. 
 
मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.केंद्राने १०२ व्या कायद्यामध्ये घटनादुरुस्ती केली.याबाबतही मराठा आरक्षणाच्या राज्यव्यापी बैठकीत निर्णय झाला असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले आहे. यावेळी अशोक चव्हाण यांच्याबाबत संताप व्यक्त केलाय तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबाबत चांगलं काम केलं असल्यामुळे त्यांचेही अभिनंदन करण्याबाबत ठराव पास करण्यात आला आहे.
 
राज्य सरकारने राज्य मगासा आयोगाची निर्मिती केली आहे. या आयोगातील अनेक लोकं ही मराठा समाजाच्या विरोधातील आहेत. आयोगात असलेल्या लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेता येत नाही. मात्र हे लोकं ओबीसी समाजाच्या लोणावळ्यात झालेल्या बैठकीला उपस्थित होते.या बैठकीत त्यांनी भाषणही दिलं असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर २ सप्टेंबरला संपुर्ण राज्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.यानंतर ७ नाहीतर ८ सप्टेंबरला राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत गणपती विसर्जनानंतर महामोर्चा काढण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.गणपती विसर्जनानंतर मुंबईत महामोर्चा काढला जाणार असल्याचा इशारा विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती