आळंदीवरुन पंढरपुरला पायी वारीने जाण्यासाठी निघालेल्या व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष, कीर्तनकार बंडातात्या कराडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने आषाढी वारीसाठी नियमावली जारी केली असून पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली आहे. मोजक्याच मानाच्या वारकऱ्यांना बसने पंढरपुरात वारीसाठी दाखल होण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारचा निर्णय नाकारुन बंडातात्या यांनी पायी वारीसाठी निघाले होते. समूहाने न जाता टप्याटप्याने वारकरी पंढरपूरकडे पायी जातील, असे शुक्रवारी बंडातात्या कराडकर यांनी आळंदी येथे जाहीर केले होते.
त्यानुसार, आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास काही वारकऱ्यांनी पायी चालायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. या सर्वांन सोडविण्यासाठी कराडकर तिथे पोहचले असता पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतल्याचं समजतेय. दिगी येथील संकल्प मंगल कार्यालयात बंडातात्या कराडकर यांना ठेवण्यात आले आहे. बंडातात्या यांना ताब्यात घेतल्यामुळे वारकरी आक्रमक झाले आहेत. पायी वारीसाठी आग्रही असणारे वारकऱ्यांनी बाहेर भजनाला सुरुवात केली आहे. वारकऱ्यांनी भजनी आंदोलन पुकारल्याचं बोललं जात आहे.
दिंडी निघालीय आता थांबणं शक्य नाही - पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले तरी चालेल. आमची तयारी आहे. आळंदीतून पंढरीच्या दिशेने पाऊल टाकले आता थांबणार नाही. आम्हाला पंढरपूरपर्यंत विना अडथळा चालू द्या. मला अधिक बोलायला लावू नका. काल कराडला कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या विजयोत्सवात दहा हजार कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला, तिथे कोरोना पॉझिटिव्ह नव्हते का. कोरोनाचे नियम आम्हाला मान्य आहे. उद्या सकाळी आम्ही पुन्हा चालू आणि चालताना तीन फुटाचे अंतर वारकऱ्यांमध्ये राहील. चालण्यासाठी वारकऱ्यांची पंचवीस संख्या ठेवली तरी आम्हाला मान्य आहे, त्यापेक्षा संख्या वाढणार नाही, हे मी लिहून देतो. आता घरी जाऊ पण उद्या सकाळी पुन्हा वारीत चालू.