सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट मॅचेसपैकी चेन्नई सुपरकिंग विरुद्ध गुजरात टायटन या संघांच्या मॅचदरम्यान मोबाईलवर मॅच पाहून बेटिंग करणार्या निशिकांत प्रभाकर पगार (वय 37, रा. सदिच्छानगर, इंदिरानगर) यास गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
औरंगाबाद रोड, नांदूर नाका परिसरात एका हॉटेलच्या मागे मोकळ्या जागेत थांबून निशिकांत हा मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहून बेटिंग घेत होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट-1 चे उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना खबर्यामार्फत माहिती मिळताच त्यांनी वरिष्ठांना ही बाब सांगितली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र बागूल, हवालदार वाघमारे, विशाल काठे, प्रदीप म्हसदे, योगीराज गायकवाड, पोलीस नाईक प्रशांत बोरकर, विशाल देवरे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चालक हवालदार नाजिमखान पठाण आदींच्या पथकाने नांदूर नाक्यावर हॉटेल राजेशाही दरबारच्या पाठीमागे सुरू असलेल्या या बेटिंग अड्ड्यावर धाड घातली आणि त्यांच्याकडून एक टॅब, दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्याविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्याचे हवालदार विश्वास काठे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
या यशाबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे आदींनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.