कोरोनाचा प्रादुर्भाव निफाड तालुक्यात काही प्रमाणात स्पष्ट जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणुन गर्दीचे केंद्र असलेल्या लासलगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारास आज सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांनी सचिव नरेंद्र वाढवणे यांचेसह अचानक भेट देऊन पहाणी केली. यावेळी आवारात विना मास्क आढळुन आलेल्या ३२ शेतकरी व कामगारांची ॲन्टीजेन टेस्ट करण्यात आली.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगांव येथे कोरोना आढावा बैठकीत दररोज बाजार समितीत आलेल्या घटकांची नियमितपणे ॲन्टीजेन टेस्ट, ऑक्सीजन व तापमान तपासणी आणि सॅनीटायझेशन करण्याबाबत अधिका-यांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांनी लासलगांव मुख्य बाजार आवारात फळे व भाजीपाला लिलावाची पहाणी करून लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारावर तसेच खानगांव नजिक तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर जे शेतकरी बांधव व इतर मार्केट घटक विना मास्क येतील तसेच त्यांचे जवळ सॅनीटाझर नसेल अशा इसमांची तात्काळ ॲन्टीजेन टेस्ट करून पॉजीटिव्ह आढळुन आल्यास तांतडीने ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करावे.