भाजपची विजयाची घोषणाबाजी, CMने माईक बाजूला सारला आणि यशोमती ठाकूरांनी रस्ता बदलला

शुक्रवार, 11 मार्च 2022 (21:29 IST)
उत्तरप्रदेश तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है... या घोषणेच्या आवाजाने विधीमंडळातला 11 मार्चचा दिवस उजाडला. सकाळपासून विरोधी पक्षाच्या आमदारांची विधानभवनात लगबग सुरू झाली होती. पायर्‍यांजवळ हे आमदार येऊन थांबत होते. आज नवाब मलिकांचा राजीनामा, शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन, ओबीसी आरक्षण हे सगळे मुद्दे मागे पडले होते.
 
आज तयारी सुरू होती स्वत:च्या पक्षांच्या नेत्यांबद्दल घोषणा देण्याची... पाच राज्यांच्या निकालात भाजपला यश मिळाल्यानंतर फडणवीस विधानभवनात येणार होते.
लांबून कुठूनतरी ढोल-ताशांचे आवाज ऐकू येत होते. ऐरवी कामकाजावेळी कायम उशीरा येणारे भाजपचे आमदार आज 9.30- 9.45 पासून घरातला समारंभ असल्यासारखे उत्साहाने विधान भवनात वावरत होते.
 
आज तसा अर्थसंकल्पाचा दिवस होता. आर्थिक पाहणी अहवालातून अधोरेखीत होत असलेली राज्याची परिस्थिती, अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या आणि सामान्यांच्या पदरात काय पडणार? हे प्रश्नार्थक बाईट देण्यासाठीही कोणी 'मिडीया स्टँडकडे' फिरकत नव्हतं.
 
'आता आम्हीच सरकार सोडतो...?'
 
4 राज्यातल्या भाजपच्या यशाची नशा विधीमंडळाच्या हवेत जाणवत होती. 'तुमचा कालचा फुगडीचा व्हीडिओ खूप व्हायरल झाला' . 'तुम्ही नाचताना भारी वाटत होतात.' माध्यमांचे प्रतिनिधी विरोधी पक्षाच्या आमदारांना-नेत्यांना मिश्किलपणे सांगत होते.
या घोळक्यात 'आता महाराष्ट्राचं काय होणार?' हा घासून गुळगुळीत झालेला प्रश्न येणं सहाजिकच होतं. "आता तुम्ही पाडू नका तर आम्हीच सरकार सोडतो असं म्हणतील, हे महाविकास आघाडीवाले...." भाजपच्या वरिष्ठ नेत्यांने हे बोलत एका पत्रकाराला टाळी दिली. या सगळ्या गप्पा गोष्टींमध्ये 10.30 वाजत आले होते.
 
एका माणसाने मोठ्या निळ्या पिशवीतून भाजपच्या टोप्या आणि गमछे वाटायला सुरवात केली होती. आमदारांची संख्याही आता वाढली होती. सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र इकडे तिकडे न बघता थेट आत निघून जात होते.
 
'आज अर्थसंकल्पातून अजितदादा निश्चितपणे शेतकऱ्यांना न्याय देतील' असे आत्मविश्वास दाखवणारे ठरलेले बाईट द्यायला सत्ताधारी आमदारही माध्यमांकडे फिरकत नव्हते.
 
10.45 च्या सुमारास भाजपचे सगळे आमदार टोप्या आणि गमछे घालून विधान भवनच्या सुरक्षा रक्षकांच्या गेटजवळ गोल करून उभे राहीले. विधानभवनाच्या परिसरातील फुललेली झेंडूची फुलं सर्रास तोडून त्या फुलांच्या पाकळ्यांचं एकमेकांना वाटप सुरू होतं.
 
नेत्यांचे स्विय सहाय्यक फुलं तोडून आपआपल्या नेत्यांना पुरवत होते. आशिष शेलार आणि अन्य मंडळी गेटच्या बाहेर उभे होते. देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतची ही तयारी होती. 5 मिनिटांतच फडणवीसांची गाडी विधानभवनात दाखल झाली.
 
...आणि यशोमती ठाकूरांनी रस्ता बदलला
'कोण आला रे, कोण आला' शिवसेनेच्या सभांमधली घोषणा भाजप नेत्यांच्या तोंडून ऐकू येऊ लागली. 'कोण आला रे कोण आला (शिवसेनेचा वाघ आला ऐवजी) महाराष्ट्राचा वाघ आला..' अश्या जोरदार घोषणा सुरू झाल्या.
आशिष शेलारांनी फडणवीसांना फेटा घातला. प्रसारमाध्यमांचे कॅमेर्‍यांची गर्दी होतीच. त्या गर्दीतून वाट काढत सर्व आमदार आणि नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला गेले.
 
वरती चढून दोन बोटांनी 'व्ही' (victory) दाखवला. पेढ्यांचे मोठमोठे' बॉक्स' उघडून पेढे वाटप सुरू झालं. विधानभवनाच्या परिसराला भाजप कार्यालयाचं स्वरूप प्राप्त झालं होतं.
 
पायर्‍यांवर सर्व आमदार 'देश का नेता कैसा हो....' वगैरेच्या घोषणा देत होते. सत्ताधारी आमदार आणि मंत्री बाजूने वाट काढत प्रवेश करत होते.
 
तितक्यात कॉंग्रेस नेत्या आणि महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर विधानभवनात येताना दिसल्या. तेव्हा विरोधी पक्षाच्या आमदारांच्या घोषणांचे आवाज अधिक वाढले. त्या मधेच फोनवर बोलत थांबल्या. विरोधी पक्षाचे आमदार त्यांच्याकडे बघून घोषणा देत होते. मग यशोमती ठाकूर यांनी वाट वळवून मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मुख्यमंत्र्याच्या दालनाजवळच्या प्रवेशद्वाराजवळून आत प्रवेश केला.
 
महाविकास आघाडीचंही शक्तीप्रदर्शन...
11 वाजले... विधानसभेची 'बेल' वाजली. देवेंद्र फडणवीस माध्यमांना बाईट देऊन विधानसभेत निघाले. भाजपच्या टोप्या, गमछे काढून सभागृहात आले. विरोधी पक्षाच्या आमदारांचे बाक पूर्ण भरलेले होते. जवळपास सगळेच आमदार उपस्थित असावेत. सत्ताधारी पक्षाकडची पहीली रांग एकटे छगन भुजबळ सोडले तर तशी रिकामी होती. मागेही फार गर्दी नव्हती. कामकाज सुरळीत सुरू होतं.
12.30 वाजल्यापासून पुन्हा विधानभवनच्या आवारात ठिकठिकाणी माध्यमांचे कॅमेरे लागले होते. सर्वांच्या नजरा प्रवेशद्वाराजवळ खिळल्या होत्या. साधारण दुपारी 1 च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प मांडणार होते.
 
अजितदादा, शंभूराजे देसाई बजेटच्या बॅग घेऊन विधानभवनात दाखल झाले. सत्ताधारी आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. अजितदादा त्यांच्या दालनात निघून गेले. काहीवेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले.
 
त्यांच्या आजारपणाच्या कारणात्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पुतळ्याच्या पायर्‍यांजवळ ठेवण्यात आला. मग पुन्हा मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. अर्थराज्यमंत्री शंभूराजे देसाई सोबत होतेच.
सत्ताधारी आमदारांनीही घोषणा दिल्या. मग अजितदादा पुन्हा मुख्यमंत्र्यांसाठी दालनातून बाहेर आले. शक्तीप्रदर्शन झाल्यानंतर अर्थसंकल्पासाठी सर्व नेते सभागृहात गेले. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडला. तोपर्यंत भाजपच्या विजयाची नशा थोडी कमी झाली होती.
 
अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि आमदार खाली आले. भाजपचा विजय, कॉंग्रेसची पिछेहाट, आपचा नव्याने उदय हे विषय मागे पडून आता फक्त 'महाराष्ट्राचं काय होणार?' राष्ट्रपती राजवट लागेल का? हे प्रश्न पुन्हा पुन्हा ठळकपणे चर्चीले जात होते. विविध अंदाज बांधले जात होते.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांमध्ये अर्थसंकल्पावर बोलल्यानंतर पाच राज्यांच्या निवडणूकीच्या निकालाचा प्रश्न विचारला. तेव्हा मुख्यमंत्री माईक बाजूला सारून 'आता नको' म्हणत निघून गेले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती