आणि सरोजताई झाल्या भावूक..

सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (21:20 IST)
नाशिक :  राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन  सुरु झाले असूनअधिवेशनासाठी विधीमंडळाचे सर्व आमदार मुंबईत हजर झाले आहेत. यात  नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे या देखील आपल्या चिमुकल्यासह अधिवेशनासाठी दाखल झाल्या. मात्र, यावेळी लहान बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये सोयी सुविधा नसल्याने आमदार अहिरे यांनी विधीमंडळातून काढता पाय घेत नाराजी व्यक्त केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या भावूक झाल्या आणि त्यांना अश्रू अनावर झाले. 
 
‘मी माझे कर्तव्य बजावण्यासाठी इथे आले आहे. माझ्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी येत असते. त्यासाठी मी प्रधान सचिवांच्या नावे हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्याची पत्राद्वारे मागणी केली होती. मात्र अपुऱ्या सुविधांसह एक कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले. माझे बाळ आजारी आहे. त्याला इथे काळजी घेण्यासाठी कोणी नाही. तो आरामात नसला तर मी कसे सभाग्रहात प्रश्न मांडणार’ असा संतप्त सवाल सरोज अहिरे यांनी केला आहे.
 
बाळ आजारी असल्यामुळे सरोज अहिरे चिंतेत होत्या. मात्र या ठिकाणी बाळासाठी डॉक्टर किंवा इतर कशाचीच व्यवस्था नाही म्हणून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार म्हणून मी जनतेचे प्रश्न मांडायला आले होते. मात्र या ठिकाणची परिस्थिती पाहता मला वाटत नाही की मी पुढील सेशनला उपस्थित राहू शकेल. एक आई म्हणून माझे समाधान झाले नाही असे म्हणत सरोज अहिरे यावेळी भावूक झाल्या. त्यांनी अधिवेशन सोडण्याचा इशारा दिला.
याआधी आमदार अहिरे यांच्या नागपूर अधिवेशनातील व्हिडिओने एकाच वेळी दोन कर्तव्य करणारी महिला विशेष म्हणजे ‘आई’ म्हणून त्यांचे कौतुक झाले. गरोदर असताना आणि आई बनल्यानंतर त्यांनी अधिवेशनाला उपस्थितीती लावली होती. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती