मुंबईतील आझाद मैदानावर आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भव्य दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्यभारातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंची स्तुती केल्याने आनंद दिघे यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली असा आरोप एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 26 जुलै 2005 च्या महापुरात बांद्र्यात सगळीकडे पाणी भरलं होतं. पण मातोश्रीमध्ये बाळासाहेबांना एकटे सोडून तुम्ही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये गेलात. बाळासाहेबांना तिथे पाण्यात मातोश्रीवर सोडून तुम्ही गेलात, तुम्ही बाळासाहेबांचे होवू शकत नाहीत ते तुमचे आमचे काय होणार. यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.
पुढे शिंदे म्हणाले की, एकदा का त्यांनी ठरवलं की एखाद्याचा काटा काढायचा की ते बरोबर काढतात. त्याची उदाहरणं मी देऊ इच्छीत नाही. रामदास कदम इकडे आहेत, मनोहर जोशी तिकडे आहेत. पण एकच सांगू इच्छीतो, धर्मवीर आनंद दिघे यांनी राज ठाकरे एवढी मेहनत करतायत म्हणून एका बैठकीत त्यांच्याबद्दल दोन शब्द चांगले बोलले. लगेच दिघे साहेबांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. त्यांना ज्या पद्धतीने वागवलं त्याचा मी साक्षीदार आहे. अपघात झाल्यावर ते बघायला आले नाहीत, अंतयात्रेला आले नाहीत. समाधीला देखील आले नाहीत.