भाजप आणि अजित पवार यांच्यात सीएम पदासाठी करार झाला आहे- संजय राऊत

सोमवार, 3 जुलै 2023 (10:39 IST)
An agreement has been reached between BJP and Ajit Pawar महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर राष्ट्रवादीतल्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या कृतीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे अजित पवार यांचा शपथविधी हे बंड असल्याचं स्पष्ट आहे.
 
छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांसारखे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतेही अजित पवारांसोबत बंडात सहभागी झाले.
 
या सगळ्या घडामोडींनंतर आज (3 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कऱ्हाडला जायला निघाले आहेत.
 
शरद पवार यांनी काल घेतलेल्य़ा पत्रकारपरिषदेतच आपण कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साताऱ्यात दलित समाजातील घटकांचा पहिला मेळावा घेणार असे जाहीर केले.
 
त्यांनी ट्वीट करुन 'त्यानंतर राज्यात आणि देशात जाऊन लोकांशी जास्तीत जास्त संपर्क वाढविण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल, ही माझी नीती राहील', असे स्पष्ट केले आहे. त्यांच्याबरोबर कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारही आहेत.
 
 अजित पवारांबद्दल मी भावनिक आहे- रोहित पवार
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात जे घडतंय ते पाहता मतदारांचंचं मत असं पडलंय की आजचं राजकारण गलिच्छ झालंय. त्यामुळे मत देऊन चुक केली की काय असं त्यांना वाटू लागलं आहे. आम्ही राजकारणात येऊन चूक केली की काय असं माझ्यासारख्या नवीन आमदारांना वाटायला लागलंय. अजित पवारांबद्दल मी भावनिक आहे. ते माझे काका आहे. अनेकदा त्यांनी मला मदत केली आहे.
 
आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं आहे. ते जी दिशा देतील त्या दिशेने आम्ही नक्कीच जाऊ असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं.
 
ही तर भाजपची पर्यायी व्यवस्था- संजय राऊत
एकनाथ शिंदे अपात्र ठरणार म्हणून ही पर्यायी व्यवस्था भारतीय जनता पक्षानं केली. त्यांना आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींनाही आता कळून चुकलंय की शिंदे आता अपात्र ठरणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पदावर अजित पवारांना बसवण्याचं काम काल झालेलं आहे. नागालँडची परिस्थिती वेगळी आहे. अजित पवार नागालँडला जाऊन मुख्यमंत्री झालेले नाही.
 
अजित पवारांच्या या निर्णयावर मी बोलणार नाही, भाजप आणि अजित पवारांमध्ये सीएम पदासाठीच करार झाला आहे. महाराष्ट्रात चिता जळत असताना हे लोक पेढे वाटत होते. 24 तासही ते थांबू शकले नाही. कालपर्यंत पवार काही लोकांचे गुरू होते मात्र त्यांनी पवारांशी बेईमानी केली, तसंच शिंदे अपात्र ठरणार हे निश्चित झालं असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
 
माझ्यासाठी दादा कायम दादाच राहील- सुप्रिया सुळे
अजित पवारांचा शपथविधी झाल्यावर काल (2 जुलै) रात्री उशिरा सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
 
त्या म्हणाल्या, "संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आपल्याकडे नाउमेद होण्याचा एक मार्ग असतो किंवा आपल्या समोर एक प्रश्न आलेला आहे, आपल्याला त्यातून नव्या उर्जेने नवा मार्ग काढायचा आहे (असा दृष्टीकोन असू शकतो.)" "ही जी घटना झालेली आहे ती आम्हा सर्वांना वेदना देणारी आहे, आणि त्याची काही कारणं असतील, त्याबदद्ल पवार साहेब सविस्तर बोलले आहे. आता नव्या उमेदीने संघटना उभी करणं हे आमचं ध्येय आहे."
 
अजित पवारांशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल त्या म्हणाल्या की, "प्रोफेशनल लाईफ आणि खाजगी नाती यात गल्लत करू नये एवढी मॅच्युरिटी मला आलेली आहे. माझ्यासाठी दादा कायम दादाच राहील.
 
सत्ता असतानाही अजित पवारांची आणि इतर पक्षातल्या आमदारांची भाजपला गरज का वाटली असावी याचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "सत्ता असतानाही त्यांना कदाचित आत्मविश्वास नसावा की आपण निवडणुका जिंकू शकू."
 
तुम्ही आता अजित पवारांबरोबर आहात की शरद पवारांबरोबर असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "या पक्षाचा आश्वासक चेहरा शरद पवार आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत. दुसरं कोणासोबत आहे की नाही हा पर्यायच मला उपलब्ध नाही."
 
एक प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादीची विश्वासार्हता कमी होईल का असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "पवार साहेब ठाम राहून लढताहेत, या गोष्टीने उलट आमची विश्वासार्हता वाढेल."
 
एकनाथ शिंदेंनीही बंड केलं होतं, आता अजित पवारांनी केलं, मग अजित पवारांनाही गद्दार म्हणणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या की, "ते झालं ते वेगळं होतं आणि हे झालं ते वेगळं."
 
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेतसाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिणार का हे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, "आताशी गोष्टी घडत आहेत, पुढे काय होईल ते बघू."
 
आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका
याच पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "मी पवार साहेबांसोबत होतो आणि पवार साहेबांसोबतच राहाणार."
 
जयंत पाटील यांनी माहिती दिली की, आमदारांच्या अपात्रतेसाठी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केलेली आहे. "त्यांना इमेलवर प्रत पाठवलेली आहे. तसंच प्रत्यक्ष कॉपी काही तासांत त्यांना मिळेल. मी त्यांच्याशी स्वतः चार वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना व्हॉट्सअपवरही मेसेज केला आहे. उद्या सकाळी लवकरात लवकर त्यांनी अपात्रतेवर आमची बाजू ऐकून घेण्यासाठी विनंती केलेली आहे. तसंच निवडणूक आयोगालाही याबद्दल कल्पना दिलेली आहे.
 
आम्ही त्यांना हेही सांगितलं आहे की महाराष्ट्रातल्या सर्व रँक आणि फाईलमधले राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते पवार साहेबांच्या बाजूने आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांतले कार्यकर्ते पवार साहेबांच्या समर्थनार्थ बाहेर आलेले आहे. नऊ आमदार म्हणजे पार्टी असू शकत नाही. त्याबद्दल राष्ट्रवादी पक्ष तातडीने कायदेशीर पावलं उचलत आहे."
 
"विरोधी पक्षातल्या लोकांवर इन्कमटॅक्स, सीबीआय किंवा इडीच्या केसेस दाखल केलेल्या आहेत. तुमच्याच पैकी एका पेपरमध्ये आरटीआयच्या माध्यमातून माहिती समोर आली होती की अशा केसेस दाखल झालेल्या राजकीय पक्षांशी संबंधित लोकांपैकी 95 टक्के लोक हे विरोधी पक्षातले आहेत. या संस्थांच्या मागे एक अदृश्य हात आहे. या संस्थांचा वापर विरोधी पक्षांच्या विरोधात केला जातो हे तुम्ही सतत चॅनलवर आणि पेपरवर सांगत असता."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती