संसदेत गोंधळ घालणाऱ्या अमोल शिंदेच्या लातूरमधील घरी झाडाझडती, बेरोजगारीमुळे होता त्रस्त
बुधवार, 13 डिसेंबर 2023 (23:18 IST)
लोकसभेच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने गॅलरीतून उडी मारल्याची घटना घडली आहे. त्यानंतर संसदेची कारवाई स्थगित करण्यात आली होती.ज्या व्यक्तीने उडी मारली त्याने बेंचवरही उड्या मारल्याचे व्हीडिओ समोर येत आहेत.या घटनेनंतर खासदारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय आणि समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी ही सुरक्षाव्यवस्थेतली त्रुटी असल्याचं म्हटलं.
ताब्यात घेतलेला तरुण लातूरचा
लातूरचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, संसदेतून ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव अमोल शिंदे आहे. तो लातूर जिल्ह्यातल्या झरी गावचा आहे.
गेल्या काही वर्षांपासून तो पोलीस भरतीची तयारी करत होता. परंतू त्याला सातत्याने अपयश मिळत होतं, अशी प्राथमिक माहिती तूर्तास पोलिसांनी दिली आहे.
या तरुणाच्या आई-वडिलांना तो कुठे आहे माहिती नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधिक्षकांना खोलवर तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
तसंच संबंधित तरुण कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं सध्यातरी प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
जरीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त
दरम्यान झरी गावात लातूर पोलिसांची अनेक पथकं दाखल झाली आहेत. दहशतवाद विरोधी पथक, एलसीबी आणि चाकूर पोलीस ठाण्याची पथकं या गावामध्ये दाखल झाली आहेत.
पोलिसांकडून अमोल शिंदेंच्या घराची तपासणी करण्यात आली. तसंच घरातील सदस्यांची माहिती घेण्यात आली.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हा घटनाक्रम सांगितला.
ते म्हणाले, “संसदेचं कामकाज सुरू होतं आणि दोन व्यक्ती अचानक गॅलरीत आल्या. त्यांनी उडी मारली. त्यातल्या एकाने बूट काढले आणि अचानक धूर आला. त्यामुळे अजूनही नाकात जळजळतंय. मग खासदारांनी त्या दोघांना घेराव घातला आणि सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं. आता ते तपास करत असतील.”
खासदार दानिश अली यांनीही लोकसभेत झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी ही सुरक्षेत मोठी चूक असल्याचं सांगितलं.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार दानिश अली म्हणाले, “पब्लिक गॅलरीमधून दोन लोकांनी उडी मारली. उडी मारल्यावर एकदम धूर निघायला सुरुवात झाली. तिथे एकदम गोंधळ झाला. सगळे लोक धावायला लागले.”
ते म्हणाले, “त्याला पकडलं आहे. एकाचा पास काढला तर तो म्हैसूरचा सागर नावाचा मुलगा होता बहुतेक. म्हैसूरच्या खासदारांमार्फत आला होता. दुसऱ्या व्यक्तीचं माहिती नाही कारण आम्ही बाहेर आलो होतो.”
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेची माहिती एबीपी माझा शी बोलताना दिली. त्या म्हणाल्या, “आम्ही सगळे सभागृहात होतो. हा प्रकार बघून आम्हाला धक्का बसला, काही खासदारांना त्या धुरामुळे उलटीसारखं होऊ लागलं. अशा परिस्थितीत सगळ्या खासदारांनी सभागृहाच्या बाहेर जाणं महत्वाचं होतं. सगळ्या खासदारांनी आणि सुरक्षारक्षकांनी एकत्र मिळून त्या व्यक्तीला पकडलं आता पुढे काय होईल ते बघावं लागेल.
मी सभागृहात जिथे बसले होते तिथून बऱ्याच अंतरावर हा प्रकार घडला. हे तरुण कोणत्या घोषणा देत होते ते ऐकू आलं नाही. त्यामुळे त्यावर इतक्या लवकर काहीही भाष्य करणं अयोग्य ठरेल.”
तर जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले, “सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास संपला होता आणि सदस्यांमध्ये कलम ३७७ वरून चर्चा सुरु होती. त्यावेळी एका युवकाने सभागृहात उडी मारली आणि तो अध्यक्षांच्या आसनाकडे धावत होता. संसद सदस्यांनी त्याला अडवलं आणि तोपर्यंत सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं.
त्याने त्याच्यासोबत काही कलर बुटातून आणले होते. आता पोलिसांनी एक मुलगा आणि एका महिलेला अटक केली आहे. पोलीस पुढची चौकशी करत आहेत.
आत्तापर्यंत कुणालाही त्या धुराचा त्रास झाला नाही. ते आंदोलक 'भारत माता की जय' अशा घोषणा देत होते.
सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं असलं तरीही ही अत्यंत गंभीर घटना आहे. त्यामुळे ही चूक कशी झाली हे बघावं लागेल आणि चौकशीनंतर ते कळेल.”
तर जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे म्हणाले, “सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास संपला होता आणि सदस्यांमध्ये कलम ३७७ वरून चर्चा सुरू होती. त्यावेळी एका युवकाने सभागृहात उडी मारली आणि तो अध्यक्षांच्या आसनाकडे धावत होता. संसद सदस्यांनी त्याला अडवलं आणि तोपर्यंत सुरक्षारक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं.
त्याने त्याच्यासोबत काही कलर बुटातून आणले होते. आता पोलिसांनी एक मुलगा आणि एका महिलेला अटक केली आहे. पोलीस पुढची चौकशी करत आहेत.
आत्तापर्यंत कुणालाही त्या धुराचा त्रास झाला नाही. ते आंदोलक 'भारत माता की जय' अशा घोषणा देत होते.
सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडलं असलं तरीही ही अत्यंत गंभीर घटना आहे. त्यामुळे ही चूक कशी झाली हे बघावं लागेल आणि चौकशीनंतर ते कळेल.”
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी झाली आहे आणि त्यानंतर आपणा सर्वांच्या सूचना लक्षात घेतल्या जातील असं ते म्हणाले.
संसदेवर हल्ला झाला तेंव्हाही आपली कारवाई सुरूच होती आणि आताही संसदेचं काम थांबणार नाही. ते कुणीच थांबवू शकत नाही. मी धुराचं परीक्षण केलं असून त्यात कसलाही धोका नाही.
संसदेत पास कसा मिळतो?
लोकसभेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार मर्यादित स्वरुपात खासदारांना पासेस मिळतात. सदस्यांना किंवा त्यांच्या पाहुण्यांना Centralized pass issue Cell तर्फे हे पासेस मिळतात. हे कार्यालय पार्लमेंट हाऊस जवळ तालकटोरा रोड येथे आहे. तसंच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पासेस मिळतात.
संसदेत प्रचंड कडक सुरक्षाव्यवस्था असते. त्याला भेदून आज या दोन व्यक्ती कशा पोहोचल्या हे पाहणं महत्त्वाचं आहे.
संसदेच्या सुरक्षेसाठी प्रोटोकॉल काय आहे?
संसदेच्या सुरक्षेबाबत ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुमार सिंह यांनी तेथील सुरक्षा व्यवस्था कशी काम करते याबाबत बीबीसीच्या प्रतिनिधी मानसी दाश यांना माहिती दिली.
अरविंद कुमार सिंह यांनी सांगितलं की, "अधिवेशन काळात किंवा अगदी सामान्य दिवसांमध्ये संसदेची स्वतःची सुरक्षा व्यवस्था आहे आणि ती खूप मजबूत असते. या अर्थानं मजबूत म्हणता येईल की संसदेचं अधिवेशन चालू नसतानाच्या काळातही त्यांची चेकिंग करण्याची व्यवस्था असते. नुकत्याच घडलेल्या घटनेचा संदर्भात म्हणायचं झालं तर, हे जे लोक आले होते, त्यांनी कुठल्यातरी खासदाराकडून त्यांचे पास बनवले होते. ते गॅलरीतून आले,त्यांच्याकडे गॅससदृश वस्तू आढळून आली, ते नेमकं काय होतं? हा तपासाचा विषय आहे."
संसदेच्या सिक्युरिटी सर्विसच्या भूमिकेच्या प्रश्नावर ते म्हणाले की, “नियमानुसार संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी लोकसभेवर असते. संसदेच्या आतील सुरक्षेची व्यवस्थेची जबाबदारी लोकसभेवर असते. दोन्ही सभागृहांचे स्वतःचे सुरक्षा कर्मचारी आहेत, ज्यांना पीएसएस (पार्लमेंट सिक्योरिटी सर्विस) म्हणतात. ही सर्विस एकंदरीत सर्व सुरक्षा पाहते."
"संसदेचं अधिवेशन सुरू असताना दिल्ली पोलिसांचे कर्मचारी सुरक्षेवर असतात. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि आयटीबीपी जवानांचाही समावेश आहे. अशा प्रसंगी इंटेलिजन्स ब्यूरो, एसपीजी, एनएसजीचे कर्मचारी इथं उपस्थित असतात कारण संसदेचं अधिवेशन सुरू असतं."
अरविंद कुमार सिंह यांनी मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं केलेल्या व्यवस्थेबद्दल सांगितलं,
"जेव्हा कोणतंही मोठं आयोजन असतं, जसं जी-20 देशांच्या सभापतींची परिषद झाली होती तेव्हा सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. 22 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर संसदेच्या सुरक्षेत अनेक हायटेक गोष्टी करण्यात आल्या आहेत. संसदेच्या कर्मचाऱ्यांकडे वैध ओळखपत्र नसेलं तर त्यांना ड्युटीवरून परत पाठवलं जातं. त्यांनाही पास बनवावा लागतो आणि त्यांच्या विभागप्रमुखांनी परवानगी दिली तरच त्यांना आत येऊ दिलं जातं."
22 वर्षांपूर्वी संसदेवर झालेल्या हल्ल्याचा बुधवार 13 डिसेंबर स्मृतिदिन आहे. त्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था कशी बदलली आहे, याविषयी ते सांगतात,
"संसदेवरील हल्ल्यानंतर तिची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे वेल इक्विप्ड (पूर्णपणे आधुनिक), डिजिटल केलेलं आहे. संसदेच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र फोर्स तयार करण्यात आलं आहे. अंतर्गत यंत्रणा मजबूत करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी करण्यात आल्या आहेत. ही खूप मजबूत व्यवस्था आहे. पार्लमेंट सिक्योरिटी सर्विसचे लोक देखील संसदेच्या सदस्यांना ओळखतात. पार्लमेंट सिक्योरिटी सर्विस हा विभाग थेट स्पीकरच्या अंतर्गत येतो."