सकाळच्या सुमारास दोघेही शिवनेरी गडावर शिवरायांच्या चरणी लीन होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. यावेळी दोघांची रस्त्यात भेट झाली. दोघांचे कार्यकर्ते आणि गडावरील लोक उपस्थित होते. आढळराव पाटील समोर येताच अमोल कोल्हेंनी थेट वाकून आढळराव पाटलांना नमस्कार केला. त्यानंतर दोघांमध्ये हसत गप्पा झाल्या आणि हस्तांदोलन करुन दोघेही मार्गस्त झाले मात्र या कृत्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन झालं.
दरम्यान या सगळ्यानंतर अमोल कोल्हे म्हणाले की, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते.वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे म्हणून की आढळराव पाटील यांना नमस्कार केला, ही संस्कृती जपली पाहिजे आणि लढण्यासाठी ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शिरुर लोकसभा मतदारसंघाची मागील काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली. त्यात आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आणि त्यांना आता राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आजच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात उभे असलेले अमोल कोल्हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा तगडा सामना पाहायला मिळणार आहे.