अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता

शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (17:59 IST)
राज्यात २०१९ साली महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून ते सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकारची प्रतिष्ठापना होईपर्यंत कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी राज्यपाल पदावरुन पायउतार होऊ शकतात. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात भगतसिंह कोश्यारी यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. मला आयुष्यातील उर्वरित काळ मनन आणि चिंतन करण्यात घालवायचा आहे. त्यामुळे मला राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली होती. 
 
पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरुन आपल्याला पदमुक्त करण्यात यावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यानंतर आता जर कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाल्यास पुढचे राज्यपाल कोण याबाबत चर्चा सुरु झाली. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. मात्र याची पुष्टी कुणाकडूनही झालेली नाही आहे. 
 
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून आलेल्या या बड्या नेत्याचे राजकीय पुनवर्सन करण्याचा हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल केले जाण्याची शक्यता आहे. भाजपा नेत्या सुमित्रा महाजन या राज्याच्या नव्या राज्यपाल होणार असल्याची माहिती आली होती. परंतु त्यांचे नाव मागे पडले आहे. आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं नाव समोर आले आहे.
 
कोण आहेत अमरिंदर सिंह?
- कॅप्टन अमरिंदर सिंह हे पंजाबच्या राजकारणातील मोठे नाव आहे.
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह यांच्या नावाचा प्रचंड दबदबा होता. 
- काँग्रेस पक्षात असताना मोठा दबदबा. अमरिंदर सिंह अनेक वर्षे पंजाब आणि काँग्रेस पक्षात राष्ट्रीय पातळीवर कार्यरत
- 1963 - 1966 या काळात ते भारतीय लष्करात होते. 
- अमरिंदर सिंह यांचे वडील पटियाला राज्याचे शेवटचे राजा होते.  
- अमरिंदर सिंह हे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.  
- कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी 18 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती