राम सीतेची बदनामी झाल्याचा आरोप करत पुण्यात 'ते' नाटक पाडले बंद, कलाकारांना अटक

रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (17:09 IST)
शुक्रवारी (2 जानेवारी) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात सुरू असलेल्या एका नाटकावर आक्षेप घेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गोंधळ घालत ते बंद पाडले.
 
या नाटकातून राम आणि सीतेची बदनामी केली जात असल्याचा आरोप अभाविपने केला.
 
यातून कलाकार आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद होत मारामारी होण्यापर्यंत प्रकरण गेले. यानंतर झालेल्या गोंधळानंतर अभाविपच्या पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन हरपुडे दाखल केलेल्या तक्रारीवरून पुणे पोलिसांनी ललित कलाच्या 5 विद्यार्थ्यांसह विभागप्रमुख प्रवीण भोळे यांना अटक केली आहे.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात नाटक कंपनीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या गोष्टींवर आधारीत एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
 
'जब वी मेट' असं या नाटकाचं नाव होतं.
 
त्यामध्ये एका नाटक कंपनीत काम करणाऱ्या कलाकारांमधले संवाद आणि वैयक्तिक आयुष्यातील विडंबनात्मक संवाद होते.
 
यात सीतेचे पात्र साकारणारा कलाकार आणि त्याच्या संवादात 'राम भाग गया, राम भाग गया' (रामाचे काम करणारा कलाकार) अशी वाक्ये होती.
 
ललित कला केंद्राचा विद्यार्थी असणाऱ्या भावेष राजेंद्र याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते.
 
नाटकाला विरोध करत हाणामारी
नाटकाचा प्रयोग सुरू असताना तिथे असलेल्या अभाविपच्या विद्यार्थ्यांनी नाटकातील संवादांना आक्षेप घेतला.
 
त्यानंतर वादाला सुरुवात झाली आणि नाटक बंद करण्यात आले. ललित कलाचे विद्यार्थी विरुद्ध अभाविप असा वाद मारामारीपर्यंत गेला.
ललित कला केंद्राच्या शिक्षक आणि विभागप्रमुखांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकार सुरु होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर हा वाद शांत झाला.
 
या घटनेविषयी सांगताना पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आणि प्रत्यक्षदर्शी केदार तहसीलदार याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले , "मी हे नाटक पहायला गेलो होतो तेव्हा तिथे अभाविपचे काही विद्यार्थी आले होते. त्यांनी नाटक पहायचे आहे असे सांगून प्रवेश मिळवला होता. त्यानंतर हे नाटक सुरू झाले तेव्हा मध्येच त्यांनी आक्षेप घेत नाटक थांबवले. वादाला सुरुवात झाल्यावर ते स्टेजवर गेले. त्यांच्या पाठोपाठ ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थी देखील स्टेजवर गेले.
 
"त्यानंतर दोन्ही गटांमध्ये वादावादी आणि झटापट झाली. या दरम्यान पोलिस दाखल झाले. त्यानंतर ललित कलाचे विभागप्रमुख विद्यार्थ्यांना घेऊन मागे गेले. त्यांना एका खोली मध्ये पाठवून त्यांनी येऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी इतर प्रेक्षकांना बाहेर जायला सांगितले.
 
याबद्दल बोलताना अभाविपचे प्रदेश सहमंत्री शुभंकर बाचल म्हणाले, "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र या विभागाकडून सादर झालेल्या नाटकांमध्ये प्रभू श्रीराम आणि सीता माता यांची भुमिका विदुषकाप्रमाणे दाखवण्यात आली. त्याच बरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत आणि देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली.
 
"अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी, देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही. संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविपने घेतली आहे.
 
कलाकारांना अटक
अभाविपच्या तक्रारीनंतर शुक्रवारी 2 फेब्रुवारीला रात्री उशिरा या प्रकरणी चतृश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
IPC कलम 294, 395 (अ), आणि 354 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
 
यानंतर नाटकात काम करणारे 4 कलाकार आणि विभागप्रमुख प्रवीण भोळेंना अटक केली आहे.
 
पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितल, "काही विद्यार्थी हे नाटक पाहत होते. त्यात हरपुडे हा विद्यार्थी होता. त्याने आक्षेप घेतल्यानंतर हा प्रकार झाला आहे. त्याने दाखल झालेल्या तक्रारीवरून नाटकात काम करणारे चार कलाकार आणि त्यांचे शिक्षक यांना अटक करण्यात आलेली आहे".
 
या कलाकारांना शनवारी (3 जानेवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा पोलिसांनी या कलाकारांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. पण न्यायालयाने ती फेटाळली आणि डॉक्टर प्रविण भोळे यांच्यासह आरोपी असलेल्या पाच विद्यार्थ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या 6 जणांना वैयक्तिक जामीन मंजूर झाला आहे.
 
कलाकारांच्या अटकसत्रानंतर आता कला क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
अभिनेते किरण माने म्हणाले, "ललित कला केंद्र पुणे येथे नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही धर्मांध गुंडांनी हातात दांडकी घेऊन स्टेजवर घुसून हल्ला केला आणि नाटक बंद पाडले. आमच्या देवाचा अपनाम करणारे नाटक तुम्ही करत आहात," असा त्यांनी आरोप केला.
 
विभा दीक्षित देशपांडे लिहीतात, "एखादी कलाकृती, कलाविष्कार न पटणे न आवडणे, राग येणे, भावना दुखावणे हे मला मान्य आहे. तो निषेध व्यक्त करण्याचे विविध मार्ग लोकशाही व्यवस्थेत आहेत. चालू नाटक बंद पाडणे, गोंधळ घालणे, धक्काबुक्की करणे योग्य नाही.”
 
पुणे विद्यापीठाने काय म्हटलं?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात मारहाणीची घटना घडल्याने विद्यापीठ प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
 
"या घटनेमुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, अशी निवेदने विविध संघटनांकडून प्राप्त झाली आहेत. कोणत्याही व्यक्तीचे, महापुरुषाचे किंना ऐतिहासिक गोष्टींचे विडंबन करणे हे पूर्णत: गैर आणि निषेधार्ह आहे," असं विद्यापिठाने काढलेल्या पत्रकात म्हटलंय.
 
या प्रकरणी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असंही विद्यापीठाने म्हटलं.
 
तर दुसरीकडे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या संघटनेने विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अभाविपचा जाहीर निषेध केला आहे.
 
"2 फेब्रुवारीला रात्री, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य कमिटी तीव्र निषेध करते. तसेच विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या अभाविपच्या गुंडांवर कडक कारवाईची मागणी करते," असं SFI महाराष्ट्राचे अध्यक्ष सोमनाथ निर्मळ यांनी म्हटलं आहे.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती