हे सर्व जण मुंगळ्यासारखे सत्तेला चिकटून बसलेले आहेत : प्रविण दरेकर

शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (21:25 IST)
शिवसेना असो वा महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी- कॉंग्रसेचे नेते असतील, त्यांची नाराजी, त्यांच्या कुरघोड्या त्यांचे एकमेकांवरचे दबावतंत्र महाराष्ट्राला माहित झाले आहे. तू रुसल्यासारखे कर मी समजावण्याचे काम करीन, असे दाखवण्यासाठी आहे, मात्र हे सर्व जण मुंगळ्यासारखे सत्तेला चिकटून बसलेले आहेत, अशी  टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. 
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, महाविकास आघाडी मधील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी अनेक वेळा नाराजी व्यक्त केली, त्यानंतर त्यांची बैठक होते, काहीतरी समझोता होतो आणि प्रकरण मिटते. तिनही पक्षांच्या नेत्यांनी आपली अनेक वेळा नाराजी व्यक्त केली तरी ते सत्ता सोडणार नाहीत. मुंगळ्यासारखे ते सत्तेला चिकटलेले आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या महत्त्वांच्या विषयाला प्राधान्य नाही. कोविडचा विषय त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. आज मोठ्या प्रमाणावर महिलांवर अत्याचार, विनयभंग होत आहेत आणि राज्य आज पूर्णपणे अस्थिर झालेले असतानासुद्धा केवळ त्यांना सत्तेची स्थिरता पाहिजे, म्हणून कितीही नाराजी त्यांनी व्यक्त केली तरी त्यातून टोकाचे काही निघेल असे मला तरी वाटत नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.
 
भाजप एवढा छोटा पक्ष नाहीय की भाजपचा कोणी वापर करून घेईल. हे सगळे भाजपच्या एकूण संख्येत मोजले तर कमीच होतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कालचे वक्तव्य याचा मी विचार केला तेव्हा मला असे वाटले की या सगळ्यांचा दबाव आणि सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी फिरवायला लागणे याबाबत विसंवाद त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना असा इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे की, मला पण भाजपचा एक मार्ग मोकळा आहेअसेही दरेकर यांनी सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती