सुनेत्रा पवार : सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत पराभूत, आता राज्यसभेची उमेदवारी; असा आहे प्रवास

गुरूवार, 13 जून 2024 (16:49 IST)
- प्राची कुलकर्णी
अजित पवारांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळेंसमोर लोकसभा निवडणुकीत बारामतीतून आव्हान उभं करणाऱ्या सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठवणार असल्याचं अखेर स्पष्ट झालं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. त्या जागेवरून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणार अशी चर्चा होती.
 
अखेर ही चर्चा खरी ठरली असून, सुनेत्रा पवार यांनी आज (13 जून 2024) राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखरेचा दिवस होता.
 
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते.
 
गेल्या दोन दिवसांपासून या उमेदवारीवरून अजित पवारांच्या नेतृत्वाती राष्ट्रवादीच्या गोटात मतभेद निर्माण झाल्याचं माध्यमांमधून सांगण्यात येत होतं. पण त्यावर काहीही औपचारिक माहिती येत नव्हती.
 
त्यात रोहित पवारांनी ट्विट करत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन केल्यानं चर्चेला तोंड फुटलं. अखेर या चर्चांवर आता पडदा पडला आहे.
 
बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद भावजयीच्या लढाईत मतदारांनी सुप्रिया सुळेंना पसंती दिली. सुनेत्रा पवार यांचा 1 लाख 58 हजार 333 मतांनी पराभव झाला.
 
सुप्रिया सुळे यांना आव्हान देण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अखेर शरद पवार गटानं बाजी मारली.
 
राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रत्येक निवडणुकीत एकत्र प्रचार करणाऱ्या या नणंद-भावजयी समोरा समोर उभ्या ठाकल्या होत्या.
 
सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिला आहे, हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
 
2019 च्या निवडणूकीत पार्थ पवार मावळमधून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आणि पवार कुटुंबातल्या वादाबद्दल चर्चेला सुरुवात झाली.
 
पार्थ यांच्या निवडणूक लढवण्याला विरोध असून त्यावरुन पवार कुटुंबात मतभेद असल्याच्या चर्चा होत होत्या. त्याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘पुणे मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं.
 
या मुलाखतीत सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या, “ दरवेळी विधानसभेचा प्रचार मी, माझी नणंद (सुप्रिया सुळे) आणि माझी मुलं मिळून करतो. अजित पवार प्रचाराला दोनदा येतात. बारामतीतल्या लोकांना त्यांनी काय केलं आहे हे सांगण्याची गरज नाही. पवारांमुळे आज बारामती इथपर्यंत पोहोचली आहे. आत्ताची (2019) ची परिस्थिती वेगळी आहे. कारण पवारांना टार्गेट केलं जात आहे, केस दाखल केल्या आहेत. कोणतेही आरोप सिद्ध होत नाहीयेत. याला लोक उत्तर देतील.
 
मी कोणत्याही वादाच्या केंद्रस्थानी कधीच राहिले नाही. मला काही हवं असतं तर ते मी मागू शकले असते. माझ्या मुलांनी राजकारणात यावं वाटलं असतं तर मी त्यांना त्यासाठी तयार केलं असतं. पण व्यक्तिशः मला राजकारणात फारसा रस नाही."
 
माहेर आणि सासरचा राजकीय वारसा
सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव जिल्ह्यातलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण.
 
धाराशिवमधल्या तेरमध्ये सुनेत्रा पवारांचं लहानपण गेलं.
 
वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील असल्याने राजकारण आणि समाजकारणाचा वसा हा तिथूनच आपल्यात आल्याचं सुनेत्रा पवार सांगतात. लोकांची घरी कायम उठबस असल्यामुळे त्यातूनच आपण घडत गेल्याचं त्या नोंदवतात.
 
पाटील आणि शरद पवार यांच्या राजकारणातल्या सख्यातून सुनेत्रा आणि अजित पवारांचे लग्न ठरले. 1980 मध्ये सुनेत्रा या लग्न होऊन बारामतीला आल्या. तेव्हा अजित पवारांनीही राजकारणात प्रवेश केलेला नव्हता. अजित पवारांचे राजकारण सुरु झाले आणि सुनेत्रा पवार मात्र सुरुवातीची काही वर्ष घरात रमल्या होत्या.
 
सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली ती काटेवाडी मधूनच. अजित पवार सातारचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या सुनेत्रा पवारांना परतताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरु असलेलं एक गाव दाखवलं. त्यातून प्रेरणा घेऊन काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात झाली.
 
याबाबत बोलताना सुनेत्रा पवार सांगतात, "मी सर्वपक्षीय लोकांची मीटिंग बोलावली. मी मीटिंग बोलावली म्हटल्यावर काय असेल असं सगळ्यांनाच वाटलं. मी माझा मानस बोलून दाखवल्यावर मात्र सगळ्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. लोकांना वाटलं मोठ्या घरच्या बायकांना एक्झिबिशन भरवायचं तशी ग्रामस्वच्छता करायची आहे का? पण मी वारंवार येत राहिले आणि त्यानंतर लोकांनाही याचं गांभीर्य लक्षात आलं.
 
त्यावेळी काटेवाटी मध्ये 80 टक्के लोकांकडे शौचालयेही नव्हती. त्यातून आणि निर्मल ग्राम आणि मग ग्राम स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली.”
 
यानंतर त्यांनी राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचे नेतृत्व केले. या माध्यमातून त्यांनी ‘निर्मल ग्राम स्वयं सहायता’ चळवळ राबवली. काटेवाडीचे निर्मल ग्राम तर झालेच शिवाय त्याचे मॉडेल आणि इको व्हीलेज म्हणूनही त्यांनी रुपांतर केले. याच्या बरोबरीनेच बारामती परिसर टॅंकरमुक्त करण्यासाठी त्यांनी ‘प्रोजेक्ट मेघदूत’ही राबवला.
 
परिसरातील स्त्रियांना रोजगार मिळण्यासाठी बारामती मध्ये टेक्सटाईल पार्कला सुरुवात झाली. जवळपास 15 हजार महिला या टेक्सटाईल पार्कमध्ये काम करतात. या टेक्सटाईल पार्कचं चेअरमनपद 2006 पासून सुनेत्रा पवारांकडे आहे. याच्या बरोबरीनेच त्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर देखील ट्रस्टी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
 
बारामतीच्या 'वहिनी' आणि राजकारण
सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार जरी बारामतीमध्ये सक्रिय असल्या तरी राजकारणाशी मात्र त्यांचा थेट संबंध येत होता तो अजित पवारांसाठी केलेल्या निवडणूक प्रचारच्या किंवा इतर वेळच्या कामांच्या निमित्ताने.
 
दर आठवड्याला बारामतीचा आवर्जून दौरा करणारे अजित पवार विकासकामांकडे लक्ष देत असले तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी मात्र बहुतांशी सुनेत्रा पवारच निभावत असायच्या. यामुळेच बारामती परिसरात 'वहिनी' ही त्यांची ओळख बनली.
 
राजकारणात मात्र त्या यापूर्वी थेट सक्रिय नव्हत्या. पण अजित पवारांसाठीच्या बारामतीच्या प्रचाराचे नियोजन आणि दौरे मात्र बहुतांश वेळा त्याच करत असत. गावभेटी, बैठका दौरे आणि महत्वाच्या लोकांना भेटणे या सगळ्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची.
 
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे राज्यभर प्रचार करत असताना प्रचाराची सुरुवात आणि समारोप यासाठी बारामतीमध्ये येणार आणि बाकी वेळी कुटुंब प्रचारात उतरणार असं समीकरण असायचं.
 
पक्ष आणि कुटुंबातील फूट
पण पार्थ पवारांच्या निवडणूकीत उतरण्याच्या निमित्ताने मात्र पवार कुटुंबात वाद असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली. पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी म्हणून सुनेत्रा पवार आग्रही होत्या अशी चर्चा होती. त्याच वेळी पवारांचे दुसरे नातू आणि राजेंद्र पवार यांचा मुलगा रोहीत पवार यांचाही राजकारणात प्रवेश झाला होता.
 
आधी जिल्हा परिषद सदस्य आणि मग कर्जत मधून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यावेळी रोहीत पवारांची आई सुनंदा पवार आणि पार्थ पवारांची आई सुनेत्रा पवार यांच्यात वाद सुरु असल्याचा दावा केला जात होता. पण त्यांनी मात्र कायमच हा दावा फेटाळून लावला.
 
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून मात्र ही फूट फक्त पक्षातलीच नव्हती तर कुटुंबातलीही होती हे स्पष्ट झालं.
 
थेट निवडणुकीच्या रिंगणात
लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झाली आणि सुनेत्रा पवार सक्रीय झाल्या. सुरुवात झाली ती वेगवेगळ्या भेटीगाठी आणि कार्यक्रमांमधून. पण महिनाभरापुर्वी त्यांचा प्रचार रथ बारामती मधून फिरायला लागला आणि त्यानंतरचं बारामतीमध्ये
 
त्यानंतर बारामतीमध्ये निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी असणार हे स्पष्ट झालं. सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या.
 
मतदारसंघासाठी महत्वाचे मानले जाणारे भोरचे थोपटे असतील की दौंडचे कुल कुटुंबीय या सगळ्यांचाच भेटी सुनेत्रा पवारांनी घेतल्या. प्रत्येक ठिकाणी ‘दादांची वहिनी म्हणून तुम्ही मला सांभाळून घेतलंतच पण सुनेत्रा वहिनी म्हणून आपलंसं केलंत’ अशी भावनिक साद घालत त्यांनी भाषणं केली.
 
आव्हानात्मक निवडणूक
पहिल्यांदा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक सोपी मात्र नक्कीच नव्हती. त्यांच्यासमोर आव्हान होतं ते नणंद सुप्रिया सुळेंचं.
 
गेली पंधरा वर्षं खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंचं संसदेतलं काम कायम वाखाणलं गेलं आहे. पण गावात लोक संपर्काच्या बाबत मात्र त्या काहीशा कमी पडत असल्याची टीकाही त्यांच्यावर होत होती. हाच धागा पकडत सुनेत्रा पवारांचा प्रचार केला.
 
दुसरीकडं शरद पवारांनी थेट प्रचारात उतरत भेटीगाठी आणि सभांना सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांच्या सभा आणि मेळावे, तर सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांचे मेळावे आणि सभा असे चित्र सध्या बारामती मध्ये दिसत आहे.
 
बारामती विधानसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी हे अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे बारामती मतदारसंघातलं मतदान हे निर्णायक ठरणार असं चित्र होतं. भोर मतदारसंघातले संग्राम थोपटे हे सुप्रिया सुळेंसोबत व्यासपीठावर दिसले, तर इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहून आपली नाराजी जाहीर केली.
 
अर्थात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे सख्य कधीच नव्हते. पण इथे दत्तात्रय भरणेंनी मात्र अजित पवारांना साथ दिली.
 
पुरंदरमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोघींच्याही पुढे विजय शिवतारेंनी आव्हान उभं केलं होतं. मात्र सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर होण्याच्या काही तास आधीच त्यांनी माघार घेत सुनेत्रा पवारांचा प्रचार करू असं म्हटलं.
 
दौंड मध्ये काही अंशी पदाधिकारी आणि भाजप या माध्यमातून सुनेत्रा पवारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
 
पण सुनेत्रा पवारांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे विरोधात उभं राहिलेल्या कुटुंबाचंच. एकीकडे भावनिक आव्हान करणारे अजित पवार, तर दुसरीकडे विरोधात बोलणारे अजित पवारांचेच सख्खे भाऊ श्रीनिवास पवार असं चित्र सध्या बारामती मतदारसंघात दिसले.
 
पवार कुटुंबापैकी अजित पवार ,सुनेत्रा पवार,जय पवार आणि पार्थ पवार हे एकत्र प्रचार करताना दिसले. दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असल्याचं दिसून आलं. सुनेत्रा पवारांच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून शरद पवार वयाच्या या टप्प्यावरही इतरांना संधी देत नाहीत हा मुद्दा आणला गेला, तर वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवारांवर ही वेळ आणली असा मुद्दा सुप्रिया सुळेंच्या प्रचारात वापरला गेला.
 
त्यामुळेच सुनेत्रा पवार मतदारांना भावनिक आवाहन करताना दिसल्या.
 
"बारामती मधला प्रत्येक व्यक्ती हा आम्हा लोकांच्या कुटुंबातला सदस्य आहे. त्यामुळे कुठं गेलं तरी तेवढंच प्रेम मला देता. हे प्रेम खूप मोठं आहे माझ्यासाठी.”

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती