अजित पवार ‘राष्ट्रवादी’वर नाराज? चर्चांना उधाण; आता हे आहे निमित्त…

सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (08:08 IST)
शिर्डी  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिर्डी येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय मंथन शिबिराच्या समारोपाच्या प्रसंगी अनेक नेत्यांची उपस्थिती होती. आजारी असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खास हेलिकॉप्टरने शिर्डी येथे दाखल झाले होते, तर दुसरीकडे संपूर्ण दिवसभर विरोधी पक्षनेते अजित पवार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीच्या अफावांना आणि उलटसुलट चर्चला उधाण आले आहे.
 
विशेष म्हणजे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनावेळीही अजित पवार यांनी असेच कार्यक्रमाचे व्यासपीठ सोडले होते. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर होत आहे, गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल शनिवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला हजेरी लावून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र तब्येत बरी नसल्याने ते फारसे बोलू शकले नाहीत. परंतु शिबिराच्या शेवटच्या दिवशी शरद पवार यांनी थेट रुग्णालयातून शिबिरात दाखल झाले. त्यामुळे कार्यकत्यांना एक वेगळी ऊर्जा मिळाली.
 
महत्त्वाचे म्हणजे शरद पवार येणार म्हटल्यावर सकाळपासून कार्यकर्ते यांच्यात जोश व उत्साह दिसत होता. मात्र पक्षाच्या शिबिराला पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर अजित पवार निघून गेले. तसेच शिबिराच्या दुसर्‍या दिवशी ते अनुपस्थित होते. याबाबत जयंत पाटील यांनी माहिती दिली. अजित पवार त्यांच्या आजोळी एका कार्यक्रमानिमित्त गेले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी परवानगी घेतली आहे. त्यामुळे कुठलीही उलटसुलट चर्चा त्यांच्या अनुपस्थितीबाबत होऊ नये, असेही पाटील म्हणाले. मात्र, याच वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने दोघे नाराज असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली. दुसरीकडे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचे सांगून राजकीय वातावरण तापवले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती