भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी आहे, आज या अकलूज विभागात कोणालाच कर्जमाफी मिळाली नाही. आमचं सरकार असताना आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. राज्य सरकारमध्ये आज दोन लाख जागा रिक्त आहेत. गृह, महसूल, जलसंपदा, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण अशा अनेक विभागात अनेक जागा रिक्त आहेत. आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अनेक जागा रिक्त आहेत.
आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यांना मी अभिवादन करतो. पण आज मी एक व्हिडिओ पाहिला. काही जातीयवादी लोक महात्मा गांधींचा फोटो समोर ठेवून त्याला गोळ्या घालत आहेत आणि तो व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. या भाजपा सरकारच्या काळात महात्मा गांधींचा अपमान केला जातोय आणि हे सरकार गप्प बसतंय. ज्या प्रवृत्तीने महात्मा गांधींची हत्या केली ती गोडसे प्रवृत्ती देशात रुजता कामा नये.
प्रत्येक निवडणुकींपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी ही निवडणूक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनात लोकांबाबत एक भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात एक वेगळाच पायंडा पाडला जात आहे. मुख्यमंत्री कुठेही गेले की विरोध करतील म्हणून लोकांना अटक केली जात आहे. या सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे म्हणून सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना देखील सरकार विविध घोषणा करत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. आ. छगन भुजबळ यांनी मिश्किल परंतु सत्यबोचऱ्या शब्दांत मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले...
नथुराम गोडसे याने आधी महात्मा गांधी यांचे दर्शन घेतले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक महात्मा त्याने संपवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेच केलं. मोदी निवडून आले आणि संसदेची पायरी चढताना त्यांनी संसदेचे दर्शन घेतले आणि लोकशाहीला छिन्नविछिन्न केले. मोदींनी दडपशाही आणून ठेवली आहे. कोणी काय खायचे, काय बोलायचे, हे ठरवले जात आहे. आता निवडणूक येणार म्हणून काही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जात आहे. सरकार पैसे देईलही, पण आज दहा हजार देतील आणि सत्तेत आले की डबल पैसे काढून घेतील.ही मन की बात झुठी बात आहे... यात गोष्टी रंगवल्या जात आहे. सर्व चांगलं सुरू आहे असं लोकांच्या मनावर बिंबवलं जात आहे.